विशेष सर्वसाधारण सभा वादळी;मतदानाने झालेले ठराव २५ विरुद्ध १५ मतांनी संमत
ओरोस ता.२३-:बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत पुन्हा सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी शिवसेना यांच्यात शाब्दिक वाद झाले. विकास कामांच्या याद्या मंजुरी वरून जोरदार खंडांजगी झाली. याद्या मंजुरी २५ विरुद्ध १५ मतांनी करण्यात आली. यावेळी शिवसेना सदस्यांनी घेतलेले आक्षेप प्रशासन प्रमुख सीईओ प्रजित नायर यांनी खोडून काढत सभा नियमात सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना सदस्यांनी निषेध करीत सभागृह त्याग केला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्यांची शेवटची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.
जिल्हा परिषद स्वनिधीतील विकासकामांना मंजुरी देणे व जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ च्या वार्षिक आराखड्याना मंजुरी देण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, सचिव राजेंद्र पराडकर, सभापती महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी, शर्वाणी गांवकर, अंकुश चव्हाण, गटनेते रणजित देसाई, नागेंद्र परब, सदस्य संतोष साटविलकर, रेश्मा सावंत, सरोज परब, संजय पडते, प्रदीप नारकर यांच्यासह ४० सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या मागील विशेष सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद स्वनिधीमधून पायवाटा व २३ नंबरला असलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. परंतु जिल्हा परिषदेच्या सूचीनुसार पायवाटा, २३ नंबरचे रस्ते स्वनिधीतून घेता येत नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सांगितले. त्यांनी यासाठी कोकण आयुक्त यांच्याकडे मार्गदर्शन मागविले होते. त्याला ४५ दिवस उलटले तरी मार्गदर्शन प्राप्त न झाल्याने आजच्या सभेत पायवाटा व २३ नंबर रस्ते मंजुरी रद्द करण्यात आली. तसेच पुरवणी यादी करून त्या बदल्यात नवीन रस्ते घेण्यात आले. २ कोटी ३५ लाख रुपये खर्चाच्या या पुरवणी आराखड्याला शिवसेनेने आक्षेप घेतला. आपल्याकडे पुरवणी यादी मागितली नाही, असा युक्तिवाद गटनेते नागेंद्र परब यांनी केला. मात्र सीईओ नायर यांनी आराखडे जिल्हा परिषद सदस्यांकडे मागविले पाहिजेत, असे कुठल्याही नियमात नाही. २४ तासांपूर्वी प्राप्त झालेली नावे आराखड्यात घ्यावी, असा नियम आहे, असे सांगत शिवसेनेचा आक्षेप फेटाळून लावला. यामुळे शिवसेना सदस्यांना राग आला व त्यांनी निषेध करीत सभात्याग केला.
