मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तहसीलदार रामदास झळके यांचे आवाहन…
वैभववाडी प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त माझे मत माझे भविष्य- एक मताचे सामर्थ्य, या विषयावर राष्ट्रीय मतदार जागरुकता स्पर्धा दि. 25 जानेवारी ते 15 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. देशातील प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देणे, तसेच लोकशाहीला बळकटी प्राप्त करून देणे, हा स्पर्धेचा उद्देश आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. स्पर्धेचा विषय – माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य. या विषयावर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेचे प्रकार पुढील प्रमाणे – प्रश्नमंजुषा स्पर्धा, व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा, गाण्याची स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा. स्पर्धेतील नियम व अटी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळावर जाणून घ्याव्यात. स्पर्धेच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी QR कोड स्कॅन करावा. सर्व प्रवेशिका पाठविण्याची मुदत 15 मार्च असून प्रवेशिका voter-contest@eci.gov.in यावर पाठवाव्यात.
गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा व भित्तिचित्र स्पर्धा संस्थात्मक, व्यावसायिक व हौशी या तीन श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक श्रेणीतील तीन विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. घोषवाक्य विजेत्यांनाही रोख बक्षिसे देण्यात येतील. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच तिसरा स्तर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येतील. तरी या स्पर्धेत मतदारांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.
