राज्यभर छेडले आंदोलन
सिंधुदुर्गनगरी ता २३ महाराष्ट्र राज्यातील सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाने सर्व सुविधा राज्यात सुरु करा, सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरा, यासह विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समिती च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकारी याना निवेदन सादर केले.
राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने २३ व २४ फेब्रुवारी या दोन दिवसाचा संप पुकारण्यात आला होता. तर आपल्या मागण्यांबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या दोन दिवसीय संपात विविध २१ कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध आस्थापनेतील ८० टक्के कर्मचारी सहभागी झाले असल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर महसूल प्रशासनातील एकूण कार्यरत ७१६ कर्मचाऱ्यांपैकी ६६६ कर्मचारी या संपात सहभागी झाले असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे. राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांबाबत पुकारण्यात आलेल्या दोन दिवसाच्या संपाची दखल घेत मंत्रालय पातळीवर कर्मचारी संघटनांचे प्रमुख आणि मंत्री महोदय यांची कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेला दोन दिवसाचा संप दुपारनंतर स्थगित करण्यात आला आहे.
या संपाच्या माध्यमातून जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावी व अंशदायी पेन्शन योजना रद्द करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीटी, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, कंत्राटी व योजना कामगारांच्या सेवा नियमित करा, या प्रमुख मागण्यासह एकुण विविध २७ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आजच्या या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे संघटक एस एल सपकाळ, शिक्षक संघटनेचे चंद्रकांत अणावकर,राजन कोरगावकर, नितिन कदम, महसुल संघटनेचे सत्यवान मालवे, शाम लाखे, संजय पवार, आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. महसुल चे ६६६ कर्मचारी संपावर राज्य सरकारी सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संपात आज जिल्हाधिकारी कार्यलयतील एकुण कार्यरत गट क आणि ड सवर्गातील ७१६ कर्मचाऱ्यांपैकी ६६६ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर १९ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. तसेच ३१ कर्मचारी आज कार्यालयात उपस्थित होते . मात्र दुपारी संप स्थगित झाल्याने काही कर्मचारी दुपारनंतर कामावर हजर झाले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिली.
