मालवण ता.२०-:* राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे उद्या दि. २१ फेब्रुवारी रोजी मालवणच्या दौऱ्यावर येत असून पर्यावरणाचा समतोल राखून विविधांगी पर्यटनातून मालवणचा कायापालट करण्याच्या दृष्टीने विविध पर्यटन उपक्रम राबविण्याबाबतचा आराखडा मंत्री आदित्य ठाकरे यांना मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मालवण शिवसेना शाखा येथे आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर हे बोलत होते. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, किरण वाळके, तपस्वी मयेकर, किसन मांजरेकर, दीपक देसाई आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे उद्या दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर आगमन होणार असून कुंभारमाठ आणि मालवण शिवसेना शाखा कार्यालय समोर त्यांचे मालवण शिवसेनेतर्फे स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर ठाकरे हे तारकर्ली येथे स्कुबा डायविंग सेंटरला भेट देणार आहेत. कोरोना काळानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी चांगली पावले उचलली आहेत. मालवण मधील किल्ले सिंधुदुर्ग मधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी मंजूर केला आहे. मालवणात २५ कोटींचे मत्स्यालय उभारण्यासाठी देखील निधीची तरतूद आदित्य ठाकरे यांनी केली. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी आणि विविध पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठी आदित्य ठाकरे नेहमीच प्रयत्नशील आहेत, असे हरी खोबरेकर म्हणाले. मालवणसह जिल्ह्याचा भविष्यात पर्यटनातून कायापालट व्हावा यासाठी विविध नाविन्यपूर्ण पर्यटन प्रकल्प व उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
निवास न्याहारी योजना, किनारी भागात बंधारा कमी रस्ते, मच्छीमार पर्यटन गाव संकल्पना, पारंपारिक मासेमारी माहिती केंद्र निर्माण करणे, जुन्या बोटींचा पर्यटनाच्या दृष्टीने उपयोग करणे, अल्प भू धारकांना ग्रामीण पर्यटनाचा लाभ मिळवून देणे, ज्या जागा मालकांच्या जागा पडीक स्वरूपात आहेत अशा जागांवर शासकीय अनुदानातून पर्यटन उपक्रम राबविणे अथवा हॉटेल्स उभारणे, पर्यटन स्थळी जाणारे रस्ते सुधारणे, मंदिरांचे सुशोभीकरण करणे, साहसी जलक्रीडा व्यवसाय प्रशिक्षण देणे, हेलिकॉप्टर सफर, दुचाकी सफर, इलेक्ट्रिक रिक्षांसाठी अनुदान देणे, हुक फिशिंग संकल्पना राबविणे, पावसाळी पर्यटनास चालना देणे, खाडी लगतच्या परिसरात जल पर्यटनास चालना देणे आदी विविध संकल्पनांद्वारे पर्यटन वृद्धिंगत करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधून याबाबतचा आराखडा त्यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी हरी खोबरेकर यांनी दिली.
