१० कोटी ९ लाख ७५ हजार रुपये होणार खर्च
सिंधुदुर्गनगरी ता १६ जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत २० टक्के सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या १० कोटी ९ लाख ७५ हजार रुपये खर्चाच्या २०७ प्रस्तावांना आजच्या समाज कल्याण समिती सभेत मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची सभा सभापती अंकुश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज संपन्न झाली.
यावेळी समिती सचिव तथा समाज कल्याण अधिकारी शाम चव्हाण, समिती सदस्य संजय पडते, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, मालवण सभापती अजिंक्य पाताडे, मानसी जाधव आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची आजची सभा निधी खर्चाच्या दृष्टीने महत्वाची होती. या सभेत जिल्हा परिषद २० टक्के सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्राप्त प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावामधून योजनेसाठी तरतूद निधीच्या अधीन राहून प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. या योजनांच्या लाभासाठी मोठ्या प्रमाणात प्रस्ताव प्राप्त झाल्याने सभापती अंकुश जाधव यांच्यासह सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद २० टक्के सेस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मागासवर्गीयांना शिलाई मशीन खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे योजनेसाठी १ लाख २५ हजार रुपये निधीची तरतूद असून त्यासाठी ७२ प्रस्ताव प्राप्त होते. त्यापैकी २५ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. घरदुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य देणे योजनेसाठी २५ लाख निधीची तरतूद असून २९८ प्रस्तावातून ७१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मागासवर्गीय वस्तीत ग्रंथालय सुरू करणे यासाठी १ लाख निधीची तरतूद असून प्राप्त २ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते योजनेसाठी ३५ लाखाची तरतुद असून प्राप्त ६३ प्रस्तावांपैकी ११ प्रस्तावांना मंजुरी दिली. घरघंटी खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे यासाठी २ लाख ५० हजार निधीची तरतूद असून प्राप्त ९७ प्रस्तावांपैकी २१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शेळीगट ( ५ शेळी, १ बोकड ) खरेदीसाठी ४ लाख ५० हजार निधीची तरतूद असून यासाठी प्राप्त झालेल्या १२३ प्रस्तावातून १६ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. स्मशानशेड साठी १८ लाख निधीची तरतूद असून प्राप्त १४ प्रस्तावांपैकी ६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. मागासवर्गीयांना ग्रासकटर खरेदीसाठी अर्थसाहाय्य देणे योजनेसाठी ९ लाखाची तरतूद असून प्राप्त १८२ प्रस्तावांपैकी ५० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मागासवर्गीय वस्तीत समाजमंदिर दुरुस्तीसाठी अर्थसाहाय्य देणे योजनेसाठी प्राप्त १५ प्रस्तावांपैकी ४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तर संगणक प्रशिक्षणासाठीच्या ३ प्रस्तावांपैकी १ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. अशाप्रकारे आजच्या समाज कल्याण समिती सभेत विविध योजनांसाठी जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या ८६९ प्रस्तावांपैकी निधीच्या तरतुदीनुसार २०७ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून यासाठी १० कोटी ९ लाख ७५ हजार रुपये निधी खर्च करण्यात येणार आहे गाव तेथे समाजमंदिर व्हावे –
प्रत्येक गावात समाज मंदिर व्हावे, मागास समाजाला प्रबोधन करण्यासाठी व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी जिल्ह्यात गाव तिथे समाजमंदिर ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी लेखाशीर्ष तयार करून जिल्हा नियोजन मध्ये निधीची तरतूद करावी, असा ठराव आजच्या समाज कल्याण समिती सभेत घेण्यात आला.
