प्राथमिक शिक्षक भारतीचे तिसऱ्या दिवशीही धरणे आंदोलन सुरू

शिक्षणाधिकारी शेख यांनी केलेल्या चर्चेत तोडगा निघाला नाही

सिंधुदुर्गनगरी ता १६ सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्या साठी सुरू असलेल्या शिक्षक भारती संघटनेच्या आंदोलनाला आज तिसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी भेट देत चर्चा केली. मात्र ठोस आश्वासन न दिल्याने आंदोलन कायम सुरूच ठेवण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन आणि प्रशासनाकडून जो पर्यन्त सकारात्मक ठोस निर्णय होत नाही, तो पर्यन्त प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहील. असा निर्धार करत आंदोलनाच्या आजच्या तीसऱ्या दिवशी आंदोलन सुरु ठेवले आहे.

आज आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षणाधिकारी मुस्ताक शेख यांनी भेट घेतली त्यांच्या मागण्या बाबत चर्चाही केली. मात्र आंतरजिल्हा बदली बाबत बोलताना त्यांनी शासनाच्या धोरणात आपण कोणतेही बदल करू शकत नाही, आपले अन्य प्रलंबित प्रश्नांवर शासन स्तरावर निर्णय होतील, तोपर्यंत आपण आंदोलन थांबवावे. अशी विनंती केली. मात्र आंतर जिल्हा बदली बाबत कोणताही ठोस लेखी निर्णय न झाल्याने आज तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू ठेवण्यात आले आहे .मात्र या आंदोलनाकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अद्याप भेट दिलेली नाही. याबाबत आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या ५व्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे .या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी १४ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे . प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धरणे आंदोलनातील मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

यामध्ये त्यांनी विविध प्रश्नाबाबत जि प शिक्षणाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे . शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत. अशी संघटनेची धारणा झाल्याने याबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त होत असून त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षकाना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे .

सोमवार पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ या वेळेत गेले तिन दिवस शिक्षकांचे आंदोलन सुरु आहे. आज आमदार कपिल पाटील यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांच्याशी चर्चा करत त्यानी आपण आयुक्तांशी आपल्या प्रश्नाबाबत चर्चा करणार आहे त्यावेळी उपस्थित राहण्यास सांगितले असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे यांनी सांगितले. मात्र हे आंदोलन तो पर्यन्त सुरूच राहील असे स्पस्ट केले. यावेळी आंदोलनात सहभागी झालेले शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You cannot copy content of this page