⚡कणकवली ता.२५-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. पंकज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी काही महिने या पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत रुग्णालयाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या कालावधीत रुग्णालयातील विविध सुविधा वाढविण्यासाठी डॉ. पंकज पाटील यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची नागरिकांकडूनही प्रशंसा करण्यात आली होती.
दरम्यान, डॉ. विशाल रेड्डी यांनीही वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. त्यानंतर प्रशासकीय नियुक्तीद्वारे एका महिला वैद्यकीय अधीक्षकांनी पदभार स्वीकारला; मात्र त्यांची नंतर बदली झाली. त्यानंतर डॉ. सचिन डोंगरे यांनीही कार्यभार सांभाळत रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालविले.
आता पुन्हा एकदा डॉ. सचिन डोंगरे यांच्या पश्चात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
