स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंतगड येथे स्वच्छता कार्यक्रम

सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त रेडी येथील यशवंतगड आणि समुद्र किनारा येथे, जिल्हा परिषद, पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, वेंगुर्ला आणि ग्राम पंचायत रेडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. ‘स्वच्छतेचे नियम पाळा, सुंदर बनवू आमची शाळा’, ‘स्वच्छता करूया सुंदर शाळा घडवूया’, ‘ध्यास स्वच्छतेचा विकास शाळेचा’ अशा घोषणा देत रेडी येथील जिल्हा परिषद शाळा नं 1, सुकळभाट विद्यालय आणि रेडी माऊली विद्यामंदिर हायस्कूलचे विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते.

या स्वच्छता कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती शर्वरी गावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, श्वेता कोरगांवकर, दादा कुबल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, विनायक ठाकूर, वेंगुर्ल्याच्या गट विकास अधिकारी उमा घारगे-पाटील, रेडीचे सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच रावसाहेब गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यशवंतगडाची माहिती व महती सर्वांना कळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत म्हणाल्या, मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करुया. महिन्यातून किमान एक दिवस सर्वांनी किल्ल्यासाठी द्यावा. किल्ल्याची स्वच्छता आणि संवर्धन करावे. सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणेच रेडीच्या यशवंतगडाचे नाव सर्वदूर प्रसिद्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले. किल्ल्यातील स्वच्छतेची जबाबदारी स्थानिकांनी घ्यावी, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर म्हणाले, किल्ले म्हणजे आपला ठेवा आहे. तो आपण जपलाच पाहिजे. रेडी गावामध्ये तसेच यशवंतगड येथे जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

त्यासाठी समाज माध्यमांचाही वापर करता येणार आहे. पर्यटन वाढीस लागल्यानंतर सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी ग्रामस्थांनी साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रेडी ग्रामपंचायत ते यशवंतगड असे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर किल्ल्यावर विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक घोषणादेत रॅली काढली. यावेळी उपस्थित मान्यवरांसह आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी किल्ल्यामध्ये स्वच्छता केली. * सोबत फोटो जोडला आहे. 00000

You cannot copy content of this page