सिंधुदुर्गनगरी ता १५ प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासन आणि प्रशासनाकडून जो पर्यन्त सकारात्मक ठोस निर्णय होत नाही, तो पर्यन्त प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरुच राहील. असा निर्धार करत आजच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरु ठेवले आहे.
शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या ५व्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे .या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी १४ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे . प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या धरणे आंदोलनातील मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी विविध प्रश्नाबाबत जि प शिक्षणाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही .
शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे . शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत. अशी संघटनेची धारणा झाल्याने याबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने सोमवार पासून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ या वेळेत मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्यात आले आहे.
आज आंदोलनाचा दूसरा दिवस असून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी हे आंदोलन जो पर्यन्त न्याय मिळत नाही तो पर्यन्त सुरूच राहील असा इशारा दिला आहे. आंदोलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशीही शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, यांच्या सह शिक्षक भारती संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक, मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
