अनधिकृत मटका बंद करा

निलेश राणेंचे एसपी दाभाडे यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी ता १५ सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालणाऱ्या अनधिकृत मटका व्यावसायामुळे तरुणपीढ़ी बरबाद होत आहे. अनेक संसार धुळीला मिळाले आहेत.तरी याबाबत तात्काळ दखल घेत जिल्ह्यातील राजरोस चालनाऱ्या मटका व्यवसायवर कारवाई करा .अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे याना निलेश राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्गातील जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात अनधिकृत मटका व्यवसायाला उत आलेला आहे. या जुगार मटका व्यवसायाच्या विळख्यात तरुण पिढी बरबाद होत असून अश्या धंद्यावर पोलीस प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालणाऱ्या या अनधिकृत मटका व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच नाव बदनाम होत असून कित्येक संसार रस्त्यावर आले आहेत. ग्रामीण भागातील महिला अश्या धंद्यामुळे त्रस्त असून पोलीस प्रशासनाचे या अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण राहिलेलं नाही.

जर हा प्रकार वेळीच थांबला नाही तर त्याचे गंभीर परिमाण समाजाला भोगावे लागतील, त्यामुळे आपण या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अश्या अनधिकृत धंद्यांचा शोध घेत योग्य ती कारवाई करावी. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून चालढकल अथवा दिरंगाई होत असल्यास आम्ही स्वतः प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना घेऊन जिल्ह्यातील अश्या प्रकरणाची माहिती ही सार्वजनिक करू असे निवेदनात माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page