ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी ता १५ -: समृद्ध आणि आनंदी गांव या नाविन्यपूर्ण प्रकल्पा अंतर्गत जिल्ह्यातील १४ गांवामध्ये क्रीड़ा आणि आरोग्य उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.त्यासाठी पशुसंवर्धन आणि क्रिडा विकासाचे धोरण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती आज माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे क्रिडा व पशुसंवर्धन विभागाचे कॅबिनेट मंत्री मा. सुनील केदार यांचा १७ फेब्रुवारी २०२२ रोजी छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय ओरोस येथील दौरा निश्चित झाला आहे. त्यासाठी कृषि प्रतिष्ठानच्या सर्व उपक्रमांद्वारे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी “समृद्ध आणि आनंदी गाव” हा नाविन्यपूर्ण प्रकल्प स्थापन करून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.
तसेच नैसर्गिक शेतीची चळवळ उभारून या जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक शेतीचा अवलंब करू लागले आहेत. कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस हे नैसर्गिक शेतीचे कार्यक्रम गेली पाच वर्षे प्राधान्याने राबवीत आहे. नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबविणारे हे केंद्र देशातील सर्व कृषि विज्ञान केंद्रा मध्ये पहिले व एकमेव आहे. आता आमच्या खास प्रयत्नातून नैसर्गिक शेतीच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थ संकल्पात स्थान प्राप्त झाले आहे.
नैसर्गिक शेतीच्या अभ्यासक्रमाचा आता कृषि शिक्षणात समावेश होणार आहे. आपले कृषि विज्ञान केंद्र हे नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचे मुख्य स्त्रोत म्हणून देशपातळीवर नावारूपास येत आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. असे यावेळी बिग्रेडियर सुधीर सावंत म्हणाले. समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाला राज्य व अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी खास प्रयत्न चालू आहेत. समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पामध्ये आरोग्य, रोजगार, क्रिडा, संस्कृती, पर्यावरण, स्वच्छता या विषयांचा प्रामुख्याने समावेश आहे.
गावे समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल .त्यासाठी जिल्ह्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्याचे क्रिडा व पशुसंवर्धन मंत्री यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील क्रिडा व पशुसंवर्धन विकासाचे धोरण चर्चा करून निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन व क्रिडा खात्यातील जवळपास ७० टक्के जागा रिक्त आहेत. हा गंभीर विषय आहे. नैसर्गिक शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी पशुसंवर्धना शिवाय पर्याय नाही. तसेच लोकांचे आरोग्य व स्वास्थ सुधारण्यासाठी क्रिडा हा विषय महत्वाचा आहे. मंत्री सुनील केदार यांचेकडे कृषि प्रतिष्ठान द्वारे विविध नाविन्य पूर्ण प्रकल्प मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत.
त्यामध्ये समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पांतर्गत गावामध्ये नैसर्गिक शेतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी व दुग्ध व्यवसाय विकासासाठी शेतकऱ्यांना देशी गाईची उपलब्धता व दुग्ध प्रक्रिया प्रकल्प., समृद्ध व आनंदी गाव प्रकल्पाच्या गावातील युवक व युवतींना परस बागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षण व कोंबडी उपलब्धता., राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत “ग्रामिण शेळी मेंढी” पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास., जिल्ह्यातील युवकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिडा व योग प्रशिक्षण केंद्र उभारणे., गावागावामध्ये व्हिलेज स्पोर्ट्स क्लब व समिती स्थापन करणे., नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांना संघटीत करून कार्यक्रम राबविणे., तसेच नैसर्गिक शेतीच्या दृष्टीने देशी गाईचे संवर्धन, दुग्ध व्यवसाय, दुग्ध प्रक्रिया, १०० पशुसेवक/ पशुमित्र यांचे प्रशिक्षण, सुधारित चारा लागवड, चारा प्रक्रिया, परसातील कुक्कुटपालन,शेळी पालन, शालेय विद्यार्थाच्या मध्यान्न भोजनामध्ये देशी अंड्यांचा वापर इत्यादी योजनेचा समावेश करून या विषयांना चर्चेमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान किर्लोस चे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, सेक्रेटरी रविंद्र सावंत, प्राध्यापक विलास सावंत, विवेक राणे आदी उपस्थित होते.
