प्राथमिक शिक्षक संघाचे संजना सावंत यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी ता १५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना वीज अत्यावश्यक आहे.त्यासाठी शाळांची गरज ओळखून शाळांच्या वीजबिलासाठी जिल्हा परिषदेमार्फत आगाऊ तरतूद करावी. अन्यथा भरलेल्या बिलांची रक्कम मासिक परताव्याने मिळावी. अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शाळांची विज बिल बाबत आपल्या स्तरावरून मागील महिन्यात वीज मंडळाला पत्र काढून थकित वीज बिला संबंधी मीटर कनेक्शन न तोडणे बाबत पत्रव्यवहार केला होता.मात्र तरीही काही ठिकाणी मीटर कनेक्शन तोडण्यात आलेली आहेत. महोदय, आज अनेक शाळांची वीज बिले मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पैशातून भरून मिटर चालू ठेवलेले आहेत. आज पर्यंत यासाठी अनुदान उपलब्ध नसल्याने फार मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.जिल्हा परिषद शाळा वीज ही अत्यावश्यक बाब असून जिल्हा परिषदेच्या वतीने त्यासाठी स्वतंत्रपणे अंदाजपत्रकीय तरतूद होणे गरजेचे आहे. आज जिल्ह्यातील बहुतेक शाळा डिजिटल शाळा झालेल्या असून त्या शाळांमध्ये लाईट फॅन्स शिवाय संगणक , स्मार्ट टीव्ही, मोबाईल या सारख्या साधनांचा अध्यापनामध्ये शैक्षणिक साधन म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व पालकांच्या सहकार्यातून अनेक शाळांनी अशा प्रकारची डिजिटल साधने उपलब्ध केलेली आहेत. त्या साधनांचा वापर अध्यापनात करण्यासाठी विजेची गरज अत्यावश्यक आहे.
तसेच शालेय पोषण आहारासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी विजेचे पंप यांचाही वापर अनेक शाळांमधून केला जात आहे. पोषण आहारासाठी व पिण्यासाठी शाळेत नियमित पाण्याची सोय असणे अनिवार्य आहे.
तरी जिल्हा परिषद शाळांमधील वीज पुरवठा ही बाब अत्यावश्यक समजून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बिलासाठी स्वतंत्र आगाऊ तरतूद करावी किंवा शाळांची भरलेली वीज बिल रक्कम मागणीनुसार मासिक परताव्यातून शाळांना मिळावी .अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजा कविटकर जिल्हा सरचिटनिस बाबाजी झेंडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
