Headlines

परवानगीशिवाय बॅनर-फ्लेक्स लावल्यास कठोर कारवाई

कणकवली नगरपंचायतीचा इशारा

कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीत अनधिकृतपणे उभारण्यात येणारे जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज यांच्याविरोधात नगरपंचायतीने कठोर भूमिका घेतली असून लवकरच विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात शहरातील प्रिंटिंग प्रेस चालक तसेच विविध राजकीय पक्षांना नगरपंचायतीकडून अधिकृत पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

मा. उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्र. १५५/२०११ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपंचायतीने स्पष्ट केले आहे.

नगरपंचायतीने दिलेल्या निर्देशानुसार, कोणतेही जाहिरात फलक, बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज छापण्यापूर्वी संबंधित व्यक्तीकडे कणकवली नगरपंचायतीकडून IWBP प्रणालीद्वारे जारी करण्यात आलेला ना-हरकत परवाना (NOC) आणि अधिकृत QR कोड असणे बंधनकारक आहे. संबंधित QR कोड प्रत्येक बॅनर किंवा जाहिरातीवर स्पष्टपणे दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

राष्ट्रीय सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवसाच्या शुभेच्छा किंवा इतर कोणत्याही कारणासाठी शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनर, फ्लेक्स किंवा होर्डिंग्जवर नगरपंचायतीची परवानगी आणि QR कोड नसल्यास ते छापू नयेत, असे स्पष्ट निर्देश प्रिंटिंग प्रेस चालकांना देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित जाहिराती अनधिकृत ठरवून त्या तात्काळ हटविण्यात येणार आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जोरदार वारे, मुसळधार पाऊस किंवा वादळी परिस्थितीत धोकादायक बॅनर व होर्डिंग्जमुळे नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेस धोका निर्माण होऊ शकतो. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघात घडणे तसेच वीज तारा किंवा खांबांवर बॅनर पडल्यास शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याचे नगरपंचायतीने नमूद केले आहे.

यामुळे नगरपंचायत हद्दीतील सर्व धोकादायक व अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंग्ज तात्काळ हटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून, परवानगीशिवाय बॅनर किंवा होर्डिंग्ज छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसवरही कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे.

You cannot copy content of this page