भरत गावडे यांचा सत्कार

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल येथील शाळेतून उपक्रमशील शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आदर्श शिक्षक भरत गावडे यांचा सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक अरविंद दीक्षित यांनी पुस्तके देऊन सत्कार केला.

यावेळी अरविंद दीक्षित यांनी भरत गावडे यांना ‘माध्यमिक शाळा प्रशासन आणि गुणवत्ता विकास’, ‘आनंद मार्गावरील आम्ही प्रवासी’, ‘आदर्श शिक्षक’, अशी पुस्तके भेट म्हणून प्रदान केली. यावेळी दीक्षित म्हणाले की, आपण सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांचे व शिक्षकांचे अत्यंत चांगले सहकार्य लाभले. ज्यामुळे जिल्हा साक्षर करण्यासाठी मदत झाली. भरत गावडे हे उपक्रमशील शिक्षक असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान देत आहेत.

तसेच त्यांनी संपादित केलेल्या मराठी अध्यापक संघाचे मासिकही दर्जेदार असून वाचनीय आहे. वाचकांनी हे मासिक जरूर वाचावे, असेही आवाहन यावेळी श्री. दीक्षित यांनी केले. आपल्या सत्काराला उत्तर देताना भरत गावडे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा साक्षर जिल्हा असला तरी अध्यापही दुर्गम वाड्या-वस्त्यापर्यंत दर्जेदार शैक्षणिक साहित्य पोहोचले नाही. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून आपण हे कार्य खेड्यापाड्यांपर्यंत घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असेही गावडे यांनी सांगितले. यावेळी मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष विजयकुमार लांडगे, सचिव पी. डी. सुतार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page