Headlines

व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कारगिल विजय दिन उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.२७-: कारगिल युद्धात शौर्य गाजवत देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना अभिवादन करण्यासाठी व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी सैनिकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करत शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक ऑनररी कॅप्टन लक्ष्मण वासुदेव राणे, तर विशेष अतिथी म्हणून माजी सैनिक हवालदार दीपक शांताराम राऊळ, बाळकृष्ण गोविंद लिंगवत आणि भरत गुरुनाथ गवस उपस्थित होते. यावेळी उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर, शिक्षिका रसिका वाटवे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रतीक्षा शिरोडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपमुख्याध्यापिका शिल्पा कोरगावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर एमएसएटी विभागाचे निदेशक भूषण सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.
‘दुनिया करते ज्याला सलाम, तोच आहे भारताचा सैनिक महान’ या भावनेला साजेशा वातावरणात विद्यार्थ्यांनी शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली. इयत्ता नववीची सिया देसाई आणि इयत्ता पाचवीची मायशा मकानदार यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच इयत्ता पहिलीतील उरुज फातिमा, वीरा मोरे, दर्श पार्सेकर आणि इयत्ता दुसरीतील अथर्व देसाई यांनी भारतीय सैन्याच्या वेषभूषेत सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी कारगिल युद्धातील शौर्यगाथा सांगत विद्यार्थ्यांना देशप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा दिली. कारगिल विजय दिन हा केवळ विजयाचा दिवस नसून भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे सुवर्णपान असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.
कार्यक्रमाला प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले, तर आभार शिक्षिका श्रुती रेडकर यांनी मानले.
फोटो:-
बांदा नाबर प्रशालेत कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page