कणकवली ता.१५-:* विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. ए. खांबल यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिप्पूर तर्फ नेसरी या ग्रामीण भागातील खेडेगावात ज्ञानसागर वाचन मंदिराला 225 पुस्तकांची भेट देऊन ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी व वाचन प्रेमी यांची ज्ञानाची भूक भागविली आहे . विद्यामंदिर माध्य . प्रशाला कणकवलीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी. ए. खांबल हे मराठी भाषेचे गाढे अभ्यासक , विद्यार्थी प्रिय अध्यापक तसेच वाचन संस्कृती जोपासणारे मातृभाषेचे उपासक आहेत. आपल्या सेवा काळातील संग्रहित ग्रंथसंग्रह जीवापाड जपलेले होते .
जी. ए. खांबल यांची मनापासून इच्छा होती की आपले सर्व ग्रंथ खेड्यांपर्यंत पोहचले पाहिजे . विद्या मंदिर हायस्कूल कणकवलीचे पर्यवेक्षक पी. जे .कांबळे यांच्या मैत्रीपूर्ण सहकार्यातून ही ग्रंथसंपदा सुपूर्द करण्यात आली आहे. योगायोगाने खांबल यांचे मौलिक ग्रंथसंपदा ग्रामीण भागातील सर्वस्तरांतील विद्यार्थी व वाचकांपर्यंत पोहचली असून शिप्पूर तर्फ नेसरी , ता . गडहिंग्लज जि . कोल्हापूर या वाचनालयाचे अध्यक्ष विजय गरबे व त्यांचे सर्व सहकारी यांनी खांबल सरांचे मनापासून कौतुक केले आहे . आजच्या काळात वाचन संस्कृती जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जी. ए. खांबल यांनी केले आहे .
