काँग्रेसच्या आंदोलन पार्श्वभूमीवर भाजपचे कार्यकर्ते राणे यांच्या बंगल्याबाहेर एकवटले

कणकवली ता.१५-:* काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थानासमोर गांधीगिरीद्वारे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर राणेंच्या ओम गणेश बंगल्याबाहेर भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी त्याचप्रमाणे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले होते .यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र पोलिसांनी काँग्रेसचे आंदोलन यांना राणे यांच्या बंगल्यासमोर येण्यापूर्वीच रोखले त्यामुळे वाद टळला.

यावेळी जि.प.चे गटनेते तथा भाजपचे नेते रणजित देसाई कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, माजी जि.प.अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, नगरसेविका मेघा गांगण, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, पंचायत समिती सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, संदीप मेस्त्री, समर्थ राणे, संदीप सावंत, दिलीप तळेकर, संदीप सावंत, संदीप साटम, आनंद उर्फ भाई सावंत, अण्णा कोदे, विजय इंगळे, नितीन पाडावे, महेश लाड, सुशील सावंत, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, संतोष चव्हाण, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण, सोनू सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना रणजीत देसाई म्हणाले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी केंद्रीयमंत्री राणेंच्या बंगल्याबाहेर गांधीगिरीद्वारे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर आम्ही राणेंच्या बंगल्याबाहेर जमलो आहोत.

हे त्यांचे आंदोलन फक्त घोषणाबाजी पुरते मर्यादित राहणार हे माहित होते,काँग्रेसचे कार्यकर्ते बंगल्यावर सोडाच, आजूबाजूच्या परिसरात ते पोहोचणार नाहीत. जिल्ह्यात झालेल्या न.पं.च्या निवडणुकीत काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले असून कुडाळच्या न.पं.च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचा नगरसेवक बसला आहे. याची हवा त्यांच्या डोक्यात गेल्याची टीका रणजीत देसाई यांनी करत आंदोलनाची भाषा काँग्रेसने करू नये, असा इशारा त्यांनी देतानाच जर ते याठिकाणी आले तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, राणे साहेबांच्या बंगल्यावर आल्यानंतर त्यांचे स्वागत कसे करायाचे हे आम्हाला चांगले ठावूक आहे. त्यापद्धतीनेच काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करू, अशी कोपरखळी समीर नलावडे यांनी पदाधिकार्‍यांना मारली.

You cannot copy content of this page