पंतप्रधानांच्या ‘त्या’ व्यक्तव्याच्या विरोधात कणकवलीत काँग्रेसने छेडले आंदोलन

ना. नारायण राणे यांच्या बंगल्यावर आंदोलनासाठी जाण्यापूर्वीच घेतले ताब्यात

कणकवली ता.१५-:* ‘नरेंद्र मोदी हाय हाय’, ‘देशाला बदनाम करणार्‍या पंतप्रधान यांचा निषेध असो’, ‘महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘राहुल गांधी तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राहुल गांधी यांचा विजय असो’, महाराष्ट्राची बदनामी करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध असो अशी घोषणाबाजी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीतील काँग्रेस कार्यालयासमोर केली.

त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश बंगल्यासमोर आंदोलनासाठी जाणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कणकवली तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सरचिटणीस महेंद्र सावंत, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह 12 जणांना 68 अन्वये प्रमाणे मुंबई पोलीस अधिनियमानुसार पोलिसांनी कारवाई करत त्यांना पोलीस स्थानकात स्थानबद्ध करून ठेवले आहे.काँग्रेसने राणे यांच्या बंगल्यासमोर आंदोलनाच्या दिलेल्या इशार्‍याच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते राणे यांच्या बंगल्यासमोर एकवटले होते. महाराष्ट्राने देशात कोरोना आणला या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभर काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर चाल करण्यास सुरुवात केली.

तहसीलदार कार्यालयाजवळ पोलिसांनी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या कारवाईमुळे काही कार्यकर्त्यांनी तेथून पळ काढला. या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस महिंद्र सावंत, तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष महेश तेली, सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, संतोष टक्के, विधाता सावंत, नीलेश तेली, अरविंद मोंडकर, प्रमोद घाडीगांवकर, संदीप कदम, अब्दूल काझी, पंढरीनाथ पांगम, दादा परब, अ‍ॅड. राघवेंद्र नार्वेकर, भालचंद्र जाधव, किरण टेंबुलकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page