धुळे येथील मोहिनी जाधवच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी ता १४ धुळे जिल्ह्यातील साक्री घटनेमध्ये स्वर्गीय मोहिनी जाधव हिच्या हत्तेतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या. या मागणीसाठी भटके-विमुक्त हक्क परिषद जिल्हा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला तर याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले.
धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर १९ जानेवारी २०२२ रोजी भटक्या विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील समाज बांधवांना साक्री येथील काही गाव गुंडानी रात्री विजयी मिरवणुकीदरम्यान रस्त्यावरून जात असताना दमदाटी करून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच ३० ते ४० गाव गुंडानी मिळून आमच्या समाज बांधव रवींद्र जगताप याला बेदम मारहाण केली.
यावेळी त्याची विवाहित बहीण मोहिनी जाधव तिने त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिला देखील त्या गाव गुंडांनी जातिवाचक शिवीगाळ करून पाठीत छातीत, पोटात लाथा, बुक्की मारून तिला जीवे मारले,. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून या हत्याकांडाचा निषेध करण्यात येत आहे. याप्रकरणी ९ आरोपींवर खुनाचा गंभीर गुन्हा दाखल झालेला असून त्यापैकी केवळ २ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. अद्यापही ७ आरोपीना पोलीस अटक करू शकलेले नाहीत.
त्यामुळे समाजबांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा भटके-विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. भटके-विमुक्त हक्क परिषद जिल्हा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या आजच्या या आक्रोश मोर्चा मध्ये अखिल भारतीय विमुक्त, भटक्या जाती जमाती ओबीसी, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने भटके-विमुक्त समाज बांधव सहभागी झाले होते. आज सकाळी १२ वाजता जिल्हा परिषद प्रवेश द्वारा कडून जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढून स्वर्गीय मोहिनी जाधव हीला न्याय द्या, तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या. अशा घोषणा देत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले.
धुळे जिल्ह्यातील साक्री येथे घडलेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. या निवेदनात त्यांनी सदर घटनेचा तपास सीआयडीकडे सुपूर्द करावा, पीडित महिलेच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्यात यावी, मोहिनी जाधव हत्तेतिल आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
