शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी ता १४ आंतरजिल्हा बदलीसह शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा परिषद समोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
शिक्षक भारतीच्या वतीने आंतरजिल्हा बदलीच्या पाचव्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्यांसह जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी आज १४ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे प्राथमिक शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडत आपल्या मागण्या बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की विविध प्रश्नाबाबत जि प शिक्षणाधिकारी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत.
भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही . शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात आहे . तसेच ३ डिसेंबर २०२१ रोजी शिक्षक भारतीच्या वतीने झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षणाधिकारी यांच्यासमवेत संघटनेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेतील आश्वासनाची कार्यवाही अद्याप झालेली नाही व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले जात आहेत. अशी संघटनेची धारणा झालेली असून याबाबत संघटनेच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त आहे.
शिक्षकांना न्याय मिळण्यासाठी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या वतीने आज सोमवारी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी ११ ते ६ या वेळेत मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सचिव अरुण पवार यांनी दिला आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आंतरजिल्हा बदली टप्पा क्रमाक ५ मध्ये सिंधुदुर्गचा समावेश होण्यासाठी १० टक्के च्या अटीतील त्रुटी दूर करून समावेश होण्यासाठीची कार्यवाही करावी.
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करावे या प्रमुख मागण्या सह शैक्षणिक कामकाजासाठी कोविड ड्युटीतुन शिक्षकांना कार्यमुक्त करावे, सातत्याने विलंबाने होत असलेले शिक्षकांचे पगार वेळेत मिळावेत, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करावे, अभावित पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबविण्यात येऊन पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद स्वनिधीतून गणवेश देण्यात यावा, १५ व्या वित्त आयोगातून शाळांची वीजबिले भरण्यात यावीत. अशा विविध मागण्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष संतोष पाताडे, सरचिटणीस अरुण पवार, उपाध्यक्ष जनार्दन पाटील ,हर्षदा राणे, मंगेश खांबलकर, रविंद्र देसाई, आदीसह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य शिक्षक, मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
