गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांची उपस्थिती
कुडाळ : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर कुडाळ तालुक्यातील घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपातील विशेष अलंकारिक महापूजा भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली. स्वामींच्या या दुर्मिळ, दिव्य आणि लोभसवाण्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी मठात गर्दी केली होती.
गुरुपौर्णिमेनिमित्त मठात दिवसभर विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी वेदपठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची विधिवत पूजा, अभिषेक आणि विशेष अलंकारिक महापूजा संपन्न झाली. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपातील स्वामींच्या मनोहारी दर्शनाने भाविक अक्षरशः भारावून गेले. दर्शन घेताना अनेकांनी स्वामींचे दिव्य रूप डोळ्यांत साठवून घेत आध्यात्मिक समाधानाचा अनुभव घेतला.
संपूर्ण मठ परिसर दिवसभर “श्री स्वामी समर्थ” या अखंड नामजपाने भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. दुपारी स्वामींची महाआरती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडली. आरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत स्वामींचे आशीर्वाद प्राप्त केले.
यावेळी स्वामींच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रम, दिव्य अलंकार आणि भक्तिमय वातावरणामुळे घावनाळे येथील श्री स्वामी समर्थ मठात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला.
