Headlines

कुडाळमध्ये ३१ जुलै रोजी महसूल समाधान शिबिराचे आयोजन

कुडाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीने राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड, कुडाळ येथे भव्य महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजना, लोकसेवा हक्कांतर्गत सेवा, महसूल विभागाची प्रमाणपत्रे तसेच आरोग्य सुविधांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हे शिबिर पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे असणार आहेत.
या शिबिरामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, विधानपरिषदेचे आमदार सर्वश्री प्रमोद जठार, ज्ञानेश्वर म्हात्रे,अनिकेत तटकरे, ॲड. निरंजन डावखरे, प्रसाद लाड, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक, मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण, मालवण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ममता वराडकर तसेच कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
राज्य शासनाच्या या विशेष अभियानाचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसेवा हक्कांतर्गत सेवांचा लाभ सुलभ करणे तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.
मनकुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, युवक तसेच विविध योजनांचे पात्र लाभार्थी यांनी या भव्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजना, सेवा आणि सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page