पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवण शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘नमन नटवरा’ हा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाने जणू मराठी संगीत रंगभूमीचा वारसा जपण्याचे काम केले.
कार्यक्रमास कोमसापचे जिल्हा समन्वयक रुजारीओ पिंटो, सिंधुदुर्गचे माजी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे तसेच पंचायत समिती मालवणचे माजी गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मुळीक यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ संगीत रंगभूमी कलाकार पं. पंडित प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना सुरेश ठाकूर यांनी पं. सावकार यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठी संगीत रंगभूमीच्या सेवेसाठी समर्पित केले असल्याचे सांगितले. पंडितराज जगन्नाथ या नाटकातील ‘जय गंगे भागीरथी’ या अजरामर गीतापासून ते संगीत संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, संगीत होनाजी बाळा आणि मंदारमाला यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांतील त्यांच्या भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम त्यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करण्यात आला.
त्यानंतर विद्याधर गोखले लिखित जय जय गौरीशंकर या संगीत नाटकातील ‘सप्तसूर झंकारीत बोले’ ही नांदी सादर करून पं. सावकार यांना संगीतबद्ध अभिवादन करण्यात आले.
यानंतर विविध कलाविष्कारांनी सजलेला सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. कुमार कांबळे व सुनंदा कांबळे यांनी सादर केलेले ‘इतिहासाचा तास’ हे विनोदी प्रहसन, प्राजक्ता खोत यांची नाट्यछटा, चंद्रशेखर धानजी व उज्वला धानजी यांचा ‘कहाणी म्हणींची’ हा सुसंवाद, मधुरा माणगावकर व रसिका तेंडोलकर यांची ‘मोलकरणीचा यशस्वी प्रवास’ ही मुलाखत, त्रिंबक आजगावकर यांचे मालवणी गीतावरील नृत्य, शरयू घाडी यांचे कथ्थक नृत्य तसेच विजय चौकेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली ‘बुवाबाजी : एक फसवेगिरी’ ही अंधश्रद्धा निर्मूलनावरील प्रात्यक्षिके यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमात मंदार सांबारी यांनी मत्स्यगंधा नाटकातील देवव्रतची एकपात्री भूमिका साकारली, तर विनोद कदम यांनी दशावतारातील पाताळकेतूची भूमिका प्रभावीपणे रंगवून रसिकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती कोमसाप मालवणचे नाट्य विभाग प्रमुख सुरेंद्र सकपाळ यांनी केली. त्यांना रमाकांत शेटये आणि महादेव बागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास कोमसाप मालवण तसेच कथामाला मालवणचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक साहित्य-नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
