जिल्ह्यासोबतच गोव्यातूनही शेकडो भाविकांची उपस्थिती
कुडाळ : येथील कविलकाटे परिसरातील शतकोत्तर ऐतिहासिक साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोवा तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दिवसभर मंदिर परिसर भक्तिरसाने आणि साईनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
सन १९२२ मध्ये स्थापन झालेल्या या ऐतिहासिक मंदिराला शंभरहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे. गुरुपौर्णिमा, साईबाबा पुण्यतिथी तसेच अक्षयतृतीयेच्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. येथील साईबाबांची सजीव भासणारी मूर्ती भक्तांना अलौकिक अनुभूती देणारी असून, दर्शन घेताना “साईबाबा प्रत्यक्ष समोर बसले आहेत,” असा भाव प्रत्येक भक्ताच्या मनात जागृत होतो.
गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येपासूनच मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी उसळली होती. याबाबत माहिती देताना राजन माडये यांनी सांगितले की, पहाटेपासूनच साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा व अभिषेक, दुपारी १२ वाजता मध्यान आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारी १ वाजल्यापासून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे उभारण्यात आलेला ध्यान साधना कक्ष. शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे गोवा तसेच महाराष्ट्रातील अनेक साधक येथे ध्यानधारणा करण्यासाठी नियमितपणे येत असतात.
गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या आत्मिक आनंदात भर घालण्यासाठी ‘विजयानंद म्युझिक क्लास’तर्फे विशेष भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सुमधुर साईभजनांनी वातावरण भक्तिमय झाले असून या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
धार्मिक विधी, आध्यात्मिक साधना आणि भक्तिसंगीताचा सुंदर संगम अनुभवत यंदाची गुरुपौर्णिमा कविलकाटे येथील साई मंदिरात अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
