Headlines

बांदा उड्डाणपुलाखाली वाहतूक नियोजन करा…

उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांची मागणी:राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदन सादर..

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंता वृषाली पाटील व सहाय्यक अभियंता श्री. कांबळे यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, उड्डाणपुलाखाली आंबोली–वाफोली मार्ग, बांदा–दोडामार्ग राज्य महामार्ग तसेच बांदा शहरातील दोन अंतर्गत रस्ते एकत्र येत असल्याने हा परिसर अत्यंत वर्दळीचा बनला आहे. मात्र, वाहतुकीचे कोणतेही शास्त्रोक्त नियोजन नसल्याने वाहने कोणत्याही दिशेने रस्ता छेदत असून सतत धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. या चौकातून दररोज चारचाकी, दुचाकी, अवजड वाहने तसेच पादचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. किरकोळ अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असल्याने भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येत्या गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची व नागरिकांची वर्दळ वाढणार असल्याने वाहतूक कोंडी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखाली वाहतुकीचे शास्त्रोक्त नियोजन, वाहतूक बेट, दिशादर्शक फलक, रस्ता मार्किंग, रंबल स्ट्रिप्स, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर आदी सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात. तसेच वाहतुकीचे नियोजन शक्य नसल्यास या मुख्य चौकात अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी आणि पादचारी व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही श्री. सावंत यांनी निवेदनातून केली आहे.

You cannot copy content of this page