पालकमंत्री नितेश राणे:अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष पथक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा,जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर ना. नितेश राणेंनी साधला संवाद..
⚡सिंधुदुर्ग दि.२१-: जिल्ह्यात ऑनलाईन मटका, ऑनलाईन गेमिंग आणि त्यातून वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ आणि विशेष पथक उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध महत्त्वाच्या विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या.
पुढे ना. नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात पोलिसांच्या कारवाईमुळे मटका व जुगाराची अनेक केंद्रे बंद झाली आहेत. मात्र, त्यानंतर ऑनलाईन माध्यमातून मटका व गेमिंगचे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः तरुण-तरुणींना ऑनलाईन गेमिंगचे व्यसन लागणे, आर्थिक नुकसान होणे तसेच त्यातून नैराश्यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.
काही आठवड्यांपूर्वी वेतोरा येथे ऑनलाईन गेमिंगच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती देखील ना. नितेश राणे यांनी दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. गोवा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची शक्यता लक्षात घेऊन सायबर गुन्ह्यांचे डिटेक्शन, तपास आणि प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कशी उभी करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली.
सायबर गुन्ह्यांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ किंवा विशेष पथकाची आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्ह्याला विशेष बाब म्हणून आवश्यक ताकद उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केले जातील, असेही ना. नितेश राणे यांनी सांगितले.
दरम्यान, शेतीच्या परिस्थितीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. दुष्काळसदृश परिस्थिती तसेच पावसाच्या खंडामुळे काही भागात भातपीक करपण्याच्या घटना उघड झाल्या आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे आली आहेत. या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि उपाययोजना कशा करता येतील, याबाबत नियोजन करण्यात आल्याचेही ना. नितेश राणे यांनी सांगितले.
