गणेशभक्त प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र, नेरूर (कुडाळ), बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी आणि बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ रेल्वे स्थानकावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या जनजागृतीसह आयोजित या शिबिराला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. गणेशोत्सवासाठी परगावाहून कुडाळ येथे येणारे शेकडो रेल्वे प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन कोकण रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य पर्यवेक्षक श्रीमती सोनिया मोचेमाडकर, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुशील बांबुळकर, कुडाळ रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर रमाकांत नाडकर्णी, कोकण रेल्वे वैद्यकीय विभागाचे किरण कोठारकर, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युषरंजन बिस्वाल, डॉ. दत्तात्रय मडवळ, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. शंकर माधव यांच्या उपस्थितीत झाले.
शिबिरात हाडे, स्नायू, सांधे आणि मणक्याशी संबंधित विकारांवर फिजिओथेरपी तज्ज्ञांकडून मोफत मार्गदर्शन व प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच रक्तदाब, रक्तशर्करा, ईसीजी यांसह प्राथमिक शारीरिक तपासणी विनामूल्य करण्यात आली. कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानेही प्रवाशांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या मोफत वैद्यकीय उपचारांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाचे रेल्वे प्रशासन, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.
