Headlines

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाची भरती प्रक्रिया पूर्ण

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नवीन कॅडेट भरती प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडली. या भरती प्रक्रियेमधून एकूण १८ विद्यार्थ्यांची एनसीसी कॅडेट म्हणून अंतिम निवड करण्यात आली आहे.

५८ महाराष्ट्र बटालियन, सिंधुदुर्ग येथील भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुबेदार प्रदीप पाटील (महाराष्ट्र) आणि सुभेदार महेंद्रसिंग (उत्तराखंड) यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचण्या, धावणे, उंची, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व नेतृत्वगुण या विविध निकषांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने निवड केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुपौर्णिमेनिमित्त सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. के. के. राबते यांच्या हस्ते उपस्थित सैन्याधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रा. के. के. राबते म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात, शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजवण्यात एनसीसीची भूमिका मोलाची आहे. महाविद्यालयात एनसीसीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य सदैव केले जाईल, असेही ते म्हणाले.

भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना एनसीसीच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधी, साहसी उपक्रम, सैन्यदलातील करिअर आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख तथा असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. मल्लेश खोत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम व शिस्त विकसित करण्यासाठी महाविद्यालय सातत्याने असे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. अन्वेषा कदम, एनसीसीचे वरिष्ठ कॅडेट्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व १८ कॅडेट्सचे संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व एनसीसी विभागाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page