युवकांनी खेळाबरोबर करिअरच्या दृष्टीने विचार करावा

राजू मुळीक : मळेवाड येथे फाइट क्लबच्यावतीने बक्षीस वितरण कार्यक्रम

बांदा ता.१४-:* मळेवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांनी क्रिकेट म्हणजे फक्त खेळ समजू नये त्याचा तर करिअरच्या दृष्टीने विचार करावा. आपले पूर्ण कौशल्य वापरून प्रथमेश नाईक सारखा क्रिकेटर आपल्या भागातून निर्माण झाला पाहिजे. खेळाबरोबर युवकांनी आरोग्यदायी उपक्रम राबवणे आवश्यक आहे. आमचा आशीर्वाद आपणास नेहमी लाभत असून भविष्यात तुम्हीही आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आवाहन, मळेवाड जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी केले.

मळेवाड येथे फाइट क्लबच्यावतीने आयोजित क्रिकेट सामन्याच्या बक्षीस वितरण समारंभावेळी राजू मुळीक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी पं. स. सदस्य बाळा शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते नंदू नाईक, शाखा प्रमुख मुन्ना मुळीक, तसेच रमाकांत नाईक, अजित काळोजी, श्रीकांत नाईक, तातो परब, विजय चराटकर, प्रवीण पार्सेकर, शैलेश शेवडे, रविंद्र तळवणेकर, बाळा रेडकर, शिक्षक अनिल गोवेकर आणि फाईट क्लबचे सदस्य उपस्थित होते. राजू मुळीक पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी मळेवाड गावातील प्रथमेश नाईक याची निवड झाली आहे.

त्याचा आदर्श घेत गुणवंत खेळाडूंनीही आपल्या गावसह तालुका, जिल्हा व राज्याचे नाव क्रिकेटच्या माध्यमातून उज्ज्वल करावे. असा एखादा खेळाडू कौशल्यवान असेल आणि त्याला आर्थिकबाबीची कमतरता भासत असेल तर त्याला आपण सर्वतोपरी सहकार्य करणार अशी ग्वाही राजू मुळीक यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन नाईक यांनी केले. अमोल रेडकर यांनी स्वागत तर नंदू नाईक यांनी सर्वांचे आभार मानले

You cannot copy content of this page