सकारात्मकतेने परीक्षांना सामोरे जा

प्रा. जगदीश धोंड’;आरपीडी’त बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

सावंतवाडी ता.१३-:* आपली शैक्षणिक वाटचाल सुखकारक व्हावी आणि त्यातून भविष्य सुरक्षित व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अभ्यास करून सकारात्मक दृष्ट्या बारावीसह पुढील परीक्षांना सामोरे जावे, असे प्रतिपादन येथील आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जगदीश धोंड यांनी केले. आरपीडी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि दर्शन खानोलकर या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात विधिता केंकरे या विद्यार्थिनीच्या ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या गीत गायनाने झाली. तर 2014 -15 या शैक्षणिक वर्षात शिकत असलेला होतकरू आणि गुणवंत विद्यार्थी दर्शन खानोलकर या विद्यार्थ्याने सी.ए. परीक्षेत उत्तीर्ण होऊन देदिप्यमान यश संपादन केले.

म्हणून महाविद्यालयामार्फत प्राचार्य धोंड यांनी शाल व श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना, दर्शन खानोलकर म्हणाले की, खूप कष्टाने आणि जिद्दीने कोणत्याही मोठ्या शैक्षणिक विद्यापीठ असलेल्या शहरात न जाता सावंतवाडीत राहूनच मी हे यश संपादन केले. यासाठी मला प्रा. एल. पी. पाटील व प्रा. रवींद्र संकपाळ व प्रा. रणजीत राऊळ , प्रा. केदार म्हस्कर, प्रा. संतोष पाथरवट तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी वेळोवेळी मदत केली. सोशल मीडियाच्या युट्युब, इंटरनेट आदी माध्यमातून आपण यश संपादन केल्याचे सांगितले. उपप्राचार्या सुमेधा नाईक यांनी दर्शन खानोलकरच्या यशाबाबत कौतुक केले.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अभ्यासासोबत आपल्या आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे, असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयातील आपलला शैक्षणिक प्रवास, जडणघडण, अनुभव आणि सर्व शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. यानंतर जेष्ठ प्राध्यापक व साहित्यिक प्रवीण बांदेकर , सांस्कृतिक विभाग कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, प्रा. वामन ठाकूर, प्रा. पवन वनवे यांनीही बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात. प्रा. केदार म्हस्कर यांनी दर्शन खानोलकरचा शाल आणि श्रीफळ देऊन वैयक्तिक सत्कार करून त्याचे अभिनंदन केले. यावेळी प्रशालेचे सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. महाश्वेता कुबल यांनी केले.

You cannot copy content of this page