मालवण ता.१३ प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित करण्यात येणारी राज्य नाट्य स्पर्धा २१ फेब्रुवारी पासून राज्यातील १९ केंद्रांवर घेण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शनिवारी केली. सोमवारी अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. ओमायक्रॉन व कोविड–१९ विषाणू संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणारी राज्य नाट्य स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.
हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ फेब्रुवारीपासून, संगीत व संस्कृत नाट्यस्पर्धा ५ मार्चपासून तर बालनाट्य स्पर्धा १० मार्च रोजी आयोजित करण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. मालवण केंद्रावर १ मार्च पासून स्पर्धा सुरू होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सर्व सहभागी संघांनी कोविड-१९ विषाणू प्रादूर्भाव संदर्भात शासनाने वेळोवळी निर्गमित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन स्पर्धेतील प्रयोगाचे सादरीकरण करावे, असे सांगून सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी सर्व सहभागी संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
