मलपी येथील हायस्पीड ट्रॉलरची वेंगुर्ला समुद्रात धुडगूस…

जाळी तोडल्याने सुमारे तीन लाखांचे नुकसान; समुद्रात गस्त घालण्याची विकी चोपडेकर यांची मागणी…

मालवण दि प्रतिनिधी कर्नाटकातील मलपी येथील हायस्पीड ट्रॉलरनी शुक्रवारी रात्री वेंगुर्लेसमोरील समुद्रात धुडगूस घालत मालवणातील बल्यावधारक मच्छीमारांची गिलनेट. जाळी (आवता) तोडली. यात सहा मच्छीमारांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. देवगडमधीलही काही मच्छीमारांची जाळी हायस्पीड टॉलरनी तोडल्याचे मच्छीमारांनी सांगितले. या प्रश्नी मालवण मच्छीमार सहकारी सोसायटीच्यावतीने विकी चोपडेकर यांनी मत्स्य विभागाला निवेदन सादर करून या भागात गस्त घालण्याची मागणी केली. मालवणातील ऑल्वीन फर्नांडिस, नितीन परुळेकर, संतोष देसाई, नारायण तोडणकर, दाजी चोपडेकर, रश्मी खंडपकर आदींच्या मालकीच्या बल्याव नौकांची जाळी हायस्पीड ट्रॉलर्सनी तोडली. पारंपरिक मच्छीमारांसमोर नियमबाह्य एलईडी पर्ससीन मासेमारीबरोबरच हायस्पीड ट्रॉलरच्या बेकायदेशीर मासेमारीचे संकट कायम आहे.

अशा प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीला रोखण्यात मत्स्य विभागाला मात्र अपयश येत आहे. त्यामुळे गिलनेटधारक पारंपरिक मच्छीमारांची मासेमारी धोक्यात आली आहे. शनिवारी दिवसभर काही मच्छीमार आपली तुटून गेलेली जाळी समुद्रात शोधत होते. मत्स्य विभागाची गस्ती नौका शनिवारी देवगड समुद्रात कार्यरत होती. जाळ्यांच्या नुकसान भरपाईची कोणतीही स्वतंत्र योजना शासन दरबारी अंमलात नाही. अशा प्रकारच्या जाळी नुकसानीची नोंद राज्यपाल अहवालासाठी सादर केली जाते.

You cannot copy content of this page