मालवण ता.१०-:* ढोल ताशांच्या गजरात, देव महापुरुषाचा जयघोष करत, भक्तीपूर्ण व चैतन्यमय वातावरणात मालवण रेवतळे येथील श्री देव महापुरुष देवालयाचा कलशारोहण समारंभ आज गुरुवारी पार पडला. यावेळी जीर्णोद्धार करण्यात आलेल्या महापुरुष मंदिरावर धार्मिक विधी व पूजा अर्चा करून कलशाचे आरोहण करण्यात आले.
मालवण शहरातील रेवतळे येथील श्री देव महापुरुष मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. यानिमित्त मंदिराच्या ७२ व्या वार्षिक उत्सवाचे औचित्य साधून दि. ८ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत कलशारोहण सोहळा साजरा होत आहे. असून आज गुरुवारी मुख्य कलशारोहण विधी पार पडला. यापूर्वी मंगळवारी मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशांची देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर ते रेवतळे अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती.
तर काल बुधवारी गणेश पूजन, पुण्याहवाचन, स्थलशुद्धी, मुख्य देवता स्थापन, जलधिवास, मुख्य देवता हवन, निद्राधिवास आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. तर आज गुरुवारी मुख्य कलशारोहण विधी पार पडला. यानिमित्त आज सकाळपासून स्थल शुद्धी, मुख्यदेवता हवन, महापूजा, कलश स्थापना, एकाशिती, कलशाचर्ना, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, आशीर्वाद ग्रहण आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी विकास कांबळी व सौ. मिलन कांबळी या दाम्पत्याच्या हस्ते कलश पूजन, कलश स्थापना व पूर्णाहुती विधी झाले. यावेळी कलशाची मंदिरा भोवती प्रदक्षिणाही करण्यात आली. भास्कर मुंडले, रजनीश मुंडले, विवेक धुपकर, नारायण मुरवणे, अभिजित पित्रे, कपिल करंबळेकर, रोहन पुराणिक, गौरीश काजरेकर आदी वेदमूर्तींच्या पौरोहित्याखाली सर्व विधी संपन्न झाले.
यावेळी जीर्णोद्धार समिती अध्यक्ष किसन साटलकर यांच्यासह देव महापुरुष बाळगोपाळ मंडळाचे सदस्य, कांबळी कुटुंबीय व रेवतळे मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यानंतर दुपारी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, १ वाजता प्रसाद, सायंकाळी कीर्तनकार महेश धामापूरकर यांचे कीर्तन तर रात्री ९ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ (शरद मोचेमाडकर) ओरोस यांचा ‘भैरव मर्दानी’ हा दशावतार ट्रिकसिन नाट्यप्रयोग पार पडला. १२ फेब्रुवारी रोजी महापुरुष देवालयाचा ७२ वा वार्षिक उत्सव साजरा होणार असून यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी अष्टपैलू कलनिकेतन भजन मंडळ यांचे भजन व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
