आरोपींना तातडीने अटक करा; पारंपरिक मच्छीमार नेत्याची पोलिसांकडे मागणी…
मालवण दि प्रतिनिधी शासकीय अधिकाऱ्यावरील हल्ला म्हणजे शासनावर हल्ला असल्याचे सांगत गुरुवारी पारंपरिक मच्छीमार नेत्यांनी आचरा पोलीस स्टेशनला भेट देवून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या कडून तपासाबाबत माहिती घेत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यावेळी सदर हल्ल्याचा तपास सुरु असून कोणताही दबाव न घेता तपास योग्य दिशेने होईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी श्रमिक मच्छीमार संघटनेचे छोटू सावजी,बाबी जोगी नँशनल फिश फोरमचे विकी तोरसकर, अखिल भारतीय क्रूती समितीचे भाऊ मोरजे,,तसेच दिलीप घारे,राजू परब आदी उपस्थित होते. मागील आठवड्यात मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांच्या वर आचरा जेठी येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या अनुषंगाने पारंपरिक मच्छीमार नेत्यांनी गुरुवारी आचरा पोलीस स्टेशनला भेट देवून तपासाबाबत माहिती घेतली होती. या बाबत माहिती देताना नँशनल फिश फोरमचे विकी तोरसकर सांगितले की तक्रारदारांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती देण्यास त्यांच्या वर काहीतरी दबाव आहे .येत्या आठ दिवसांत मत्स्य विभाग मंत्री ना अस्लम शेख यांची भेट घेणार आहोत. गरज पडल्यास पुर्ण माहिती न देणारया अधिकारी आणि सुरक्षारक्षकाची चौकशी करून निलंबन करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
