*⚡कणकवली ता.२७-:* कणकवली येथील नगरपंचायत हद्दीतील सर्वे नंबर १५९अ , हिस्सा नंबर ७१ या मिळकती मधील १०८.१४ चौ.मी. इमारत वाणिज्य तळमजला व निवासी पहिला मजला अशा स्वरुपाचे बांधकाम करण्यासाठी विकास शुल्क व इतर शुल्क भरूनही कणकवली नगरपंचायतीने बांधकाम परवानगी दिलेली नाही. त्यामुळे माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी कुटुंबियांसह प्रांताधिकारी कार्यालया समोर प्रजासत्ताक दिनी साखळी उपोषण सुरू केले आहे.
हे उपोषण अजून ही सुरू आहे. दरम्यान, सर्व्हे नंबर १५९अ , हिस्सा नंबर ७१ या मिळकती मध्ये बांधकाम करण्यास परवानगी मिळावी ही उमेश वाळके यांची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर नगरसेवक रविंद्र बाळकृष्ण गायकवाड व त्यांचे भाऊ प्रविण गायकवाड हे नगरपंचायत कणकवलीचे कर्मचारी आहेत . त्यांनी स्वतः तळमजला अधिक एक मजला बांधकाम हे अनधिकृतच केलेले आहे. या दोन्ही बांधकामांवर कार्यवाही करावी अशी ही मागणी केली आहे. तसेच जोपर्यंत संबधित बांधकाम काढून टाकत नाही व संबधित नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे प्रशासनास दिलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, उपोषण स्थळी उमेश वाळके यांची शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रदीप मांजरेकर,नगरसेवक कन्हैया पारकर,राजेंद्र पेडणेकर,प्रसाद अंधारी,बाळा वराडकर,आदी नागरीकांनी भेट घेतली. तसेच त्यांचे म्हणणे ही जाणून घेतले.
