झाराप ग्राम पंचायत अनियमितता कारवाई प्रकरण;गटनेते रणजित देसाई यांची मागणी
*⚡ओरोस ता.२१-:* झाराप ग्राम पंचायतने जिल्हा परिषदेने पैसे देऊन सुद्धा एका कामाचे ठेकेदाराला ९ महिने पैसे दिले नव्हते. याबाबत चौकशी करण्यासाठी कुडाळ गटविकास अधिकारी यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. या चौकशीत अहवालात कुडाळ गटविकास अधिकारी यांनी अनियमितता झाल्याचे म्हटले आहे. परंतु कोणत्या कलमाखाली कारवाई करावी, ते नमूद केलेले नाही. गेले दोन महिने याबाबत विचारणा करून सुद्धा गटविकास अधिकारी यांनी माहिती दिलेली नाही. त्यामुळे गटनेते रणजित देसाई यांनी कुडाळ गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
स्थायी समितीची सभा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समिती सचिव तथा सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटनेते रणजित देसाई, सदस्य संतोष साटविलकर, अमरसेन सावंत, विष्णुदास कुबल यांच्यसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. झाराप ग्राम पंचायत चौकशी प्रकरणी कुडाळ गटविकास अधिकारी यांनी दिलेले उत्तर सुद्धा संदिग्ध होते. त्यामुळे सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी गटविकास अधिकारी यांनी आपल्या अहवालात कोणत्या कायद्याखाली चौकशी करावी, हे नमूद करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावर देसाई यांनी गटविकास अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याने गटविकास अधिकारी यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी २०१७-१८ व २०१८-१९ या आर्थिक वर्षात रीतसर मंजुरी देऊन करण्यात आलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांची बिले अद्याप मिळालेली नाहीत. यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून २७ कोटी रुपये निधी प्राप्त झालेला नाही, अशी माहिती स्थायी समिती सभेत पुढे आली आहे. यामुळे कामे केलेले ठेकेदार आर्थिक अडचणीत आले असल्याने सभागृहाने राज्य शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी जिल्हा वार्षिक योजनेचे दायित्व शासनाने अद्याप दिलेले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तब्बल पाच वर्षे झाली तरी शासन दायित्व देत नसेल तर काय करणार ? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
चौकट वेंगुर्ले शहराला जोडणाऱ्या नवाबाग येथे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी झुलते पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ४० लाख रुपये निधी खर्च झाल्यावर हे काम रद्द करण्यात आले. आता नव्याने ४ कोटी १२ लाखांचे काम मंजूर करण्यात आले आहे. मात्र, त्याला पायऱ्या ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यापेक्षा तेथे सरळ रस्ता ठेवावा. यामुळे नवाबाग येथील नागरिकांना दुचाकी, चारचाकी घेऊन वेंगुर्ले शहरात येण्या-जाण्यास सोयीचे होईल, असे सदस्य विष्णुदास कुबल यांनी सांगितले. तसा ठराव घेण्यात आला.
