प्रा रुपेश पाटील यांना नेशन बिल्डर पुरस्कार

सर्वांगीण कामासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने केला सन्मान

सावंतवाडी ता १०: आजगाव येथील प्रा. रुपेश पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, व लोकप्रबोधन क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा व विधायक ठसा उमटविला आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग सामाजिक परिवर्तनासाठी उत्तमरीतीने उपयुक्त ठरत असल्यामुळे त्यांना रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले.

रोटरीचे पीडीजी डॉ. विनय कुमार रायकर पै यांच्या हस्ते प्राध्यापक रुपेश पाटील यांना नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरीचे गोवा प्रतिनिधी अजय मेनन, सावंतवाडी रोटरी क्लबचे गोल्डन जुबिली अध्यक्ष साईप्रसाद हवालदार सचिव सुधीर नाईक, खजिनदार आनंद रासम, इव्हेंट चेअरमन प्रमोद भागवत, दिलीप म्हापसेकर, प्रदीप शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा.रुपेश पाटील यांनी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा राज्यात अनेक ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर आपल्या व्याख्यानांमधून प्रबोधन केले आहे. ज्यामुळे सामाजिक जनजागृती करण्याचे कार्य प्रा.पाटील यांनी केले आहे. प्रा. रुपेश पाटील यांना आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा त्यांचा शासनस्तरावर पुरस्कार देऊन गौरवही केला आहे. प्रा.रुपेश पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊनच त्यांना नेशन बिल्डर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा.पाटील यांच्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page