भरपाई न दिल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा यशवंत माधव यांचा इशारा
*⚡बांदा ता.०७-: मडुरा गावात तिलारी पोट कालव्यासाठी भातशेती क्षेत्रात खोदाई करुन अर्धवट स्थितीत कामे आहेत. खोदाई केलेली माती पावसाळ्यात अन्य क्षेत्रात घुसल्याने शेतकर्यांचे बेसुमार नुकसान झाले आहे. तिलारी कालवा कार्यकारी अभियंता राहुल कोरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मडुरा गावात तिलारी कालव्याच्या पोटकालव्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. सदर माती अन्य शेतीत घुसल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. चवडीवाडी येथील शेतकरी नारायण धुरी यांच्या तर संपूर्ण भातशेती क्षेत्रात मधोमध खोदाई करण्यात आली. त्यामुळे त्यांना यावर्षी शेती करणेच शक्य झाले नाही. सर्वत्र माती घुसल्याने दलदल निर्माण झाली आहे. साहजिकच त्यांच्या उपजिविकेचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकर्यांच्या समस्या यशवंत माधव यांनी तिलारी कालवा अधिकार्यांसमोर मांडल्या. ठेकेदाराने दादागिरी करुन खोदाई केल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी करावी व संबंधित नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्यावी अशी मागणी माधव यांनी केली आहे. अन्यथा शेतकर्यांना सोबत घेऊन प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
