बांदा शहरातील अंतर्गत रस्त्यावरील अवजड वाहतूक रोखा

बांदा ग्रामपंचायतच्या वतीने निवेदन : शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होतोय त्रास

*⚡बांदा ता.०७-:* मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोवा सीमेवरील तपासणी नाके चुकविण्यासाठी अवजड वाहतूक ही बांदा शहरातील अंतर्गत रस्त्यावरून सुरू आहे. या वाहतुकीमुळे दोन दिवसांपूर्वी एका दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू झाला होता. शहरातील अंतर्गत रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असल्याने ही अवजड वाहतूक रोखवी व तात्काळ कारवाई करावी अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने बांदा पोलीस ठाणे, उपप्रादेशिक परिवहन सिंधुदुर्ग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेडणे-गोवा यांना निवेदन देण्यात आले आहे.

गोवा सीमा तपासणी नाक्यावर कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आल्याने वाहनांच्या लांब रांगा असतात. यामुळे तपासणी नाके चुकविण्यासाठी गोव्यात जाताना अवजड मालाची वाहतूक करणारे चालक बांदा शहरातील अंतर्गत रस्त्याचा वापर करत आहेत. यामुळे शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच भरधाव वेगात वाहने चालवत असल्याने याचा त्रास शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावर शाळा, महाविद्यालय व श्री बांदेश्वर मंदिर आहे. यामुळे या रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची वर्दळ असते. अशा परिस्थितीत अवजड वाहनांमुळे याठिकाणी अपघातांची शक्यता देखील वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर ही अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात आज निवेदन देण्यात आले. सिंधुदुर्ग व गोवा आरटीओ विभागाने अवजड वाहतुकीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, शामसुंदर मांजरेकर, बाळू सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, बाळा आकेरकर, साहिल कल्याणकर, तोरसे सरपंच बबन डिसोझा आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page