माजी नगराध्यक्ष गिरप यांचे आवाहन
*⚡वेंगुर्ले ता.०७-:* सत्ताधारी, विरोधक व प्रशासन हे एक कुटुंब आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही नगरपरिषदेच्या रथाची दोन चाके आहेत सर्वांनी एकत्र येवून एकदिलाने काम केल्यास सर्व काही शक्य होऊ शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वेंगुर्ला नगरपरिषदेने या पाच वर्षात केलेली अद्वितीय अशी विकास कामे आहेत असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्नेहमेळाव्यात करत, नगरपरिषदेची नवीन कार्यकारीण अस्त्विात येईपर्यंत विकास कामांचा दर्जा टिकवण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी असे आवाहन केले.
वेंगुर्ला नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि कर्मचारी यांचा स्नेहमेळावा ४ जानेवारी रोजी येथील स्वामी विवेकानंद सभागृहात संपन्न झाला. नोव्हेंबर २०१६ मध्ये पार पडलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षांचा कार्यकाळ दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी संपुष्टात आला. या पाच वर्षाच्या कालावधीत न.प. अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांचे एक भावनिक नाते निर्माण झाले होते. हाच धागा पकडून नगरपरिषद अधिकारी व कर्मचा-यांनी या सर्व सदस्यांसोबत हा स्नेहमेळावा आयोजित केला होता.
यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, माजी उपनगराध्यक्षा शीतल आंगचेकर, अस्मिता राऊळ, माजी नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, विधाता सावंत, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, कुतिका कुबल, आत्माराम सोकटे तसेच मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांच्यासाहित न प मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी एकत्रित येवून मागील पाच वर्षात केलेल्या कार्याचा तसेच आपल्या आठवणींना उजाळा दिला. तर नगरपरिषद प्रशासनामार्फत माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षा तसेच नगरसेवकांना आठवण भेट म्हणून मागील पाच वर्षात केलेल्या अद्वितीय विकास कामांचा फोटाे अल्बम भेट देण्यात आला.
