*⚡कणकवली ता.३१-:* खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलला नाकारून सुज्ञ सभासदांनी त्यांची जागा दाखवली अशी टीका भाजपा खारेपाटण शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर यांनी केली आहे.
खारेपाटण गट सेवा सोसायटीचे पंचवार्षिक निवडणूक काल पार पडली. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत सत्ताधारी सहकार पॅनेल आणि विरोधी कालभैरव परिवर्तन पॅनेल यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या विजयाने खारेपाटण परिसरात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे हे सिद्ध झाले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर भालेकर बोलत होते. ते म्हणाले,ही निवडणूक चुरशीची होईल अशा प्रकारचे वातावरण परिवर्तन पॅनेलच्या नेते मंडळींकडून निर्माण करण्यात आले होते. मात्र त्याकडे लक्ष न देता सत्ताधारी पॅनेलचे पॅनेल प्रमुख विजय देसाई, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार ,शक्ती केंद्रप्रमुख सूर्यकांत भालेकर आणि अन्य सहकारी यांनी अचूक रणनीती आखून सहकार पॅनेलला मोठा विजय मिळवून दिला.
विरोधकांनी सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केल्या खऱ्या ,मात्र या भूलथापांना सभासद बळी पडले नसल्याचे दिसून आले. सत्ताधारी सहकार पॅनेलने आपली प्रचार यंत्रणा अतिशय नियोजनबद्ध आखली होती. उमेदवारांची निवड देखील आमचा विजय होण्यास कारणीभूत ठरली. सर्वसामान्य सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून गत पाच वर्षात भ्रष्टाचारविरहित पारदर्शक कारभार केल्यामुळेच सभासदांनी आमच्या पॅनेलला भरघोस मतांनी निवडून दिले आहे, असे सूर्यकांत भालेकर यांनी सांगितले. विरोधक आमच्यावर टीका करत राहिले मात्र या टीकेला सभासदच उत्तर देतील अशी खात्री आम्हाला होती. विरोधकांनी गाव पॅनेलच्या नावाखाली निवडणूक लढवली खरी, मात्र मते मागताना महाविकास आघाडीच्या नावाने मते मागितली. त्यांचे काही उमेदवार हे शिवसेनेच्या नावानेही मते मागत होते. ही बाब सभासदांना रुचली नाही. खारेपाटण गट सेवा सोसायटी ही खारेपाटणसहित कणकवली तालुक्यातील वारगाव, शिडवणे, नडगिवे वायंगणी ,चिंचवली देवगड तालुक्यातील कुणकवण आणि राजापूर तालुक्यातील पन्हाळे, गुंजवणे ,शेजवली आणि वाल्ये अशा एकूण 11 गावांचे कार्यक्षेत्र असणारी संस्था आहे.या संस्थेवर केवळ खारेपाटण गावातीलच लोकांचे वर्चस्व असावे, या भावनेतूनच विरोधकांनी गाव पॅनेल उभारले. वास्तविक संस्था 11 गावांचे मिळून असताना केवळ आम्हीच या संस्थेचे मालक आहोत ही भावना काहींच्या मनात निर्माण झाली होती. त्याला सणसणीत प्रत्युत्तर सुज्ञ सभासदांनी दिले आहे. विरोधकांना आमच्याविरोधात एकास एक असे उमेदवारदेखील देता आले नाहीत ते संस्था काय चालवतील हे सुज्ञ व सभासदांनी ओळखूनच त्यांना नाकारले आहे. आमच्या पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणारे सर्व सभासद मतदार , पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच हितचिंतक या सर्वांचे आम्ही ऋणी असून आगामी 5 वर्षांत सभासदांना अभिप्रेत असणारे काम आमचे नूतन संचालक मंडळ प्रामाणिकपणे करेल असा विश्वास भालेकर यांनी व्यक्त केला आहे.
