सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

मंत्री नारायण राणे यांची आजही जिल्ह्यावर पकड : आठ जागांवर महाविकास आघाडीला मानावे लागले समाधान

*⚡ओरोस ता.३१-:* महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व गाजवत सत्ता आणली असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जिल्ह्यावर आजही पकड असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा बँकेच्या १९ जागांसाठी एकूण ३९ उमेदवार रिंगणात होते. या १९ जागांपैकी ११ जागांवर एकहाती विजय मिळवत भाजपने जिल्हा बँक आपल्या ताब्यात घेतली आहे.

तर केवळ ८ जागांवर महाविकास आघाडीला समाधान व्यक्त करावे लागले आहे. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह १० संचालकांना अनपेक्षित असा पराभव सहन करावा लागला आहे. यामध्ये सतिश सावंत, राजन तेली, विकास सावंत, सुरेश दळवी यांच्यासारख्या मातंबर नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. यामध्ये तालुका मतदार संघात पार पडलेल्या निवडणुकीत कणकवली मधून सेनेचे सतिश सावंत आणि भाजपचे विठ्ठल देसाई यांच्यात झालेली लढत टाय झाल्यानंतर चिठ्ठी उडविण्यात आली होती, यात नशिबाच्या जोरावर विठ्ठल देसाई यांनी विजय मिळवत सतिश सावंत यांचा पराभव केला.

तर सावंतवाडी तालुक्या मध्ये सेनेच्या विद्याधर परब यांनी भाजपच्या गुरुनाथ पेडणेकर यांचा पराभव केला, तसेच कुडाळ तालुक्यात काँग्रेसच्या विद्याप्रसाद बांदेकर यांनी भाजपच्या प्रकाश मोर्ये आणि भाजपचे बंडखोर सुभाष मंडव यांचा पराभव केला आहे. वेंगुर्ला येथे भाजपचे मनीष दळवी यांनी विजय संपादन केला असून, काँग्रेसचे विलास गावडे पराभूत झाले आहेत. दोडामार्ग येथे सेनेच्या गणपत देसाई यांनी विजय मिळवत भाजपच्या प्रकाश गवस यांचा पराभव केला आहे. मालवण तालुक्यात राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस यांनी भाजपच्या कमलाकांत कुबल यांचा पराभव करत विजय प्राप्त केला आहे. तर वैभववाडी येथे भाजपच्या मोहन रावराणे यांनी सेनेच्या दिगंबर पाटील यांचा पराभव केला आहे. देवगड तालुक्यात अपक्ष अविनाश माणगावकर यांचा पराभव करत भाजपच्या प्रकाश बोडस यांनी विजय मिळवला आहे. तर उर्वरित जिल्हास्तर अकरा मतदार संघातील पंतसंस्था मतदारसंघातून सेनेच्या सुशांत नाईक यांनी माजी जिल्हा बँक अध्यक्ष राजन तेली यांचा पराभव केला आहे. पणन मतदार संघातून भाजपच्या अतुल काळसेकर यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश दळवी यांचा पराभव केला आहे. मजूर औद्योगिक मतदार संघातून भाजपच्या गजानन गावडे यांनी सेनेच्या लक्ष्मण आंगणे यांचा पराभव केला. मच्छिमार व दुग्धसंस्था मतदारसंघातून भाजपचे महेश सारंग यांनी राष्ट्रवादीच्या मधुसूदन गावडे यांचा पराभव केला आहे. घर बांधणी देखरेख संस्थेतून राष्ट्रवादीच्या विनोद मर्गज यांनी भाजपच्या संदीप परब यांचा पराभव केला आहे. तर वैयक्तिक मतदार संघातून भाजपच्या समीर सावंत यांनी काँग्रेसच्या विकास सावंत यांचा पराभव केला आहे. महिला प्रतिनिधी मतदार संघातून काँग्रेसच्या निता राणे आणि भाजपच्या प्रज्ञा ढवण यांनी विजय संपादन केला असून, सेनेच्या आनारोजिन लोबो आणि भाजपच्या अस्मिता बांदेकर यांचा पराभव झाला आहे. अनुसूचित जाती मतदार संघातून राष्ट्रवादीच्या आत्माराम ओटवणेकर यांनी भाजपच्या सुरेश चौकेकर यांचा पराभव केला आहे. इतर मागास मतदार संघात भाजपच्या रवींद्र मडगावकर यांनी सेनेच्या मनीष पारकर यांचा पराभव केला आहे. विमुक्त भटक्या जमाती मतदार संघातून काँग्रेसच्या मेघनाथ धुरी यांनी भाजपच्या गुलाबराव चव्हाण यांचा पराभव केला आहे. गेली अनेक वर्ष जिल्हा बँक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हातात होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात राजकीय समीकरणे बदलल्याने ती सेनेच्या हातात गेली होती. परंतु, अनेक दिग्गज उतरलेल्या या निवडणुकीत मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. जिल्हा बँकेवर सत्ता येताच संपूर्ण सिंधुदुर्गात भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके लावत एकच जल्लोष केला आहे.

You cannot copy content of this page