ॲड. भाग्यश्री भोसले यांचे प्रतिपादन;कारीवडे येथे जागतिक ग्राहक संरक्षण दिन साजरा
*⚡सावंतवाडी ता.२९-:* ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर १९८६ रोजी केंद्र शासनाने अंमलात आणला. या कायद्याने ग्राहकांना वस्तू खरेदी करताना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना सामान्य माणसाने जागरूकता दाखवली पाहिजे. तरच ग्राहकांची फसवणूक होणार नाही, असे प्रतिपादन ॲड.भाग्यश्री भोसले यांनी केले. जागतिक ग्राहक संरक्षण दिनानिमित्त यशस्विनी सामाजिक संस्था, सावंतवाडी यांच्यावतीने श्री देव हेळेकर ग्रामसंघ, कारीवडे-पेडवेवाडी येथे जागतिक ग्राहक संरक्षण दिन विषयक जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात ॲड. भोसले यांनी मार्गदर्शन केले. त्या पुढे म्हणाल्या, आजही शहरी किंवा ग्रामीण भागात ग्राहक खरेदी करताना जागरूकता दाखवत नाहीत. ग्राहक व ग्राहक सेवा, पुरवठादार, उत्पादक यांच्यातील परस्पर विश्वास कमी होत चालला आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांना असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उमेद अभियान सावंतवाडीचे प्रभाग समन्वयक अभय भिडे, उपकेंद्र सिंधुदुर्ग समाज कार्य विभागाचे प्रा. अमर निर्मळे, प्रा. माया रहाटे आणि प्रा. गायकवाड, समाजकार्य विभागाचे विद्यार्थी तसेच ग्रामसंघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्विनी सामजिक संस्थेचे सदस्य रोहन शारबिद्रे, नंदकिशोर फोंडेकर, प्रवीण चव्हाण यांनी केले.
