प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना पत्रकार संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्कार जाहीर

कवी अजय कांडर यांच्या हस्ते 1 जानेवारी रोजी बेळगावात वितरण

*⚡कणकवली ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा कबीर साहित्य पुरस्कार बेळगाव येथील मराठी-कन्नड साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना जाहीर झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते शनिवार 1 जानेवारी रोजी सायं.4 वा. बेळगाव येथील लोकमान्य ग्रंथालयाच्या सभागृहात सदर पुरस्काराने डॉ.नाईक यांना गौरविण्यात येणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, सामाजिक कार्यकर्ते कॉ.संपत देसाई, सिंधुदुर्ग विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

रोख दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ असे सदर पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी सदर पुरस्कार संपत देसाई यांच्या ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ या ग्रंथाला प्राप्त झाला होता तर यावर्षी डॉ.नाईक यांच्या समग्र साहित्य कर्तृत्वाचा विचार करून सदर पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा.डॉ. शोभा नाईक या सध्या बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य आणि मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून कविता, समीक्षा, संशोधन आणि अनुवाद आदी साहित्य प्रकारात त्या लेखन करतात.त्यांचे आजवर विविध लेखन प्रकारातील अनेक ग्रंथ प्रकाशित आहेत.महाराष्ट्र शासनाच्या भारतीय साहित्य कोश निर्मिती मंडळ तसेच मराठी भाषा विकास नियामक मंडळ वर सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्काराने त्यांना तीन वेळा गौरविण्यात आले आहे. त्यामध्ये संशोधन, समीक्षा आणि सौंदर्यशास्त्रासाठी असणाऱ्या श्री.के. क्षीरसागर या पुरस्काराचाही समावेश आहे. तर कर्नाटक शासनाच्या अकरावी- बारावी मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्या कार्यरत होत्या. तसेच त्यांचे कर्नाटक शासनाकडून कन्नड ग्रंथांचे मराठी अनुवाद प्रकाशित झालेले आहेत. ‘या जगण्यातून’ हा कवितासंग्रह, ‘जीबन नरह यांची आसामी कविता’ हा अनुवाद,भारतीय संदर्भातून स्त्रीवाद-स्त्रीवादी समीक्षा आणि उपयोजन, लोकसंचितातील स्रीचित्तवेध, बहिणाबाई चौधरी यांची कविता हा समीक्षा ग्रंथ, ‘देखणी: जगण्याचे ऊर्ध्वपातन ‘ हा समीक्षा ग्रंथ, बेगम बर्वे:एक दृष्टिक्षेप हा समीक्षा ग्रंथ,कन्नड संतकवी कनकदास अनुवाद, व्यर्थ न हो बलिदान कन्नड कादंबरी अनुवाद, दुर्गा भागवत,(साहित्य अकादमी) आदींसह 16 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झाले आहेत तर पुढील काळात साहित्य अकदमीतर्फे त्यांचे काही ग्रंथ प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. या त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांना संजय कांबळे स्मृती कबीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे कांबळे परिवारातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page