कणकवली 28 डिसेंबर (प्रतिनिधी)-कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही सामाजिक चळवळीतून गेले ४३ वर्षें संघर्ष करीत आलो आहोत. मात्र कोकणातील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या कामांमध्यै कधीही पक्षभेद विसरून संघटितपणे प्रयत्न केले नाही. त्यामुळे विकास कामांचा बट्टाबोळ झाला आहे. त्यामुळे कोकणचे नंदनवन निर्माण करायचे असेल तर कोकणातील सामाजिक भान असलेल्या युवा पिढीने आता कोविआची पताका खांद्यावर घ्यावी, असे आवाहन कोकण विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी दादर-मुंबई येथे केले. कोविआच्या दादर येथील छबिलदास मुलांच्या शाळेत ४३ साव्या वार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यकर्यांच्या “चिंतन” शिबीराच्या अध्यक्षपदावरुन श्री केळुसकर बोलत होते. व्यासपीठावर सरचिटणीस सूर्यकांत पावसकर, उपाध्यक्ष भाऊसाहेब परब होते. पर्यटन विकासाचे मापदंड ठरणारे वायंगणी येथील सी-वर्ड प्रकल्प, केरळच्या धर्तीवर अंर्तगत बोट वाहतूक, समुद्र किनार्यांचा विकास, पौराणिक आणि इतिहासकालीन गड-किल्ले, मंदिरे आदी बाबींच्या विकास कामांना गती दिली तर कोकणचा पर्यटनद्दुष्ट्या कोकणचा झपाट्याने विकास होईल, असे सांगून केळुसकर म्हणाले, मुंबई-कोकण-गोवा, पश्चिम किनारी सागरी महामार्ग, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, नियोजित चिपळूण-कराड, वैभववाडी-कोल्हापूर असे रेल्वेचे मार्ग असे विकासाभिमुख प्रकल्प राजकारणाच्या पक्षीय नाकर्तेपणामुळे रखडत आहेत. तसेच कोकणातील अनेक पाटबंधारे प्रकल्प गेली तीस-चाळीस वर्षें रडत रखडत चालले आहेत. त्यामुळे कोकणचा विकास खुंटला आहे. भाजपप्रणीत केंद्र शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे आता तरुणांना शासकीय नोकरी विसरावी लागणार आहे. त्यामुळे तरुणांना कल्पकतेने व्यवसायांच्या संधी शोधाव्या लागणार आहेत, असे सांगून ते म्हणाले, कोकणभूमीचे खर्या अर्थाने नंदनवन करायचे असेल तर युवा पिढीने आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती-बागायतीकडे वळले पाहिजे. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त, पत्रकार किरण नाईक यांनी मोहन केळुसकर हे आमच्यासारख्या पत्रकारांचे गुरू आहेत, असे सांगून ते म्हणाले, गेली ४३ वर्षें आम्ही त्यांची कोकण विकासासाठी चालवलेली चळवळ एक कार्यकर्ता म्हणून जवळून अनुभवत आहोत. मात्र दुर्दैवाने चार-दोन तुकड्यांसाठी राजकीय नेत्यांशी लाळघोट करणार्या युवा पिढीमुळे कोकणची एक पिढी बरबाद झाली आहे. सामाजिक क्षेत्रात ४३ वर्षें टिकून काम करणे सोपी गोष्ट नाही. कोकणचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर युवा पिढीने राजकीय पक्षांच्या नांदी न लागता कोविआसारख्या सामाजिक संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. गावोगावी या संघटनेच्या शाखा सुरु करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. शेतीपूरक व्यवसायांतून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
यावेळी सर्वश्री गणपत चव्हाण, भाऊसाहेब परब, चिटणीस प्रकाश तावडे, विलास गांगण, प्रा. घन:श्याम आजगावकर, माजी नगरसेवक विजयकुमार दळवी, सुरेश गुडेकर, रमेश ठाकरे, अंकुश घाडीगांवकर आदींनी संघटना वाढीसंदर्भात उपयुक्त सूचना केल्या. सूर्यकांत पावसकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर डोंगरे, रमाकांत जाधव, चंद्रकांत आम्रे आदींनी विशेष प्रयत्न केले. यावेळी दिवंगत कार्यकर्ते ओम अलंकार शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नार्वेकर, केळुसकर यांचे जेष्ठ बंधू भाई प्रभू, रमेश सूर्यकांत पावसकर, भारती शिवगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. )
