कणकवली 26 डिसेंबर (प्रतिनिधी)-सा .बां . खात्याने शासनाच्या सर्व परवानग्या मिळाल्याने चार महिन्यात काम सुरु होईल असे सांगितले , पण प्रत्यक्षात काही काम सुरु झाले नाही म्हणून आता सोमवार द२८ फेब्रुवारी रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी साखळी उपोषण सुरू करणार आहोत . घाटमार्गाचे प्रत्यक्ष काम सुरु होईपर्यंत हे उपोषण सुरू राहील .
मधल्या काळात कलेक्टर कार्यालयासमोर धरणे आंदोलन , पणदूर तिठा येथे रस्ता रोको आंदोलन , सोनवडे येथे आत्मदहन आंदोलन व शेवटी घाटमाथ्याच्या शिखरावरून उड्या मारुन आत्महत्या आंदोलन करणार आहोत . याची शासन व प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असा इशारा सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीचे नाटेकर यांनी दिला आहे. सोनवडे येथे सोनवडे घाटमार्ग संघर्ष समितीची बैठक आयोजित केली होती . त्यावेळी प्रा . महेंद्र नाटेकर बोलत होते . यावेळी गणेश बुटाले , सत्यवान ढवळ , देवीदास तेली , विलास सदडेकर , विलास ढवळ , नारायण गावडे , तुळसीदास कालेकर , काशिराम घाडीगांवकर , भावेश परब , दिवाकर परब , निलेश तेली , अमोल तेली , बाळा राणे , दिलीप तवटे , संतोष मडव , बाळा मडव , सरपंच बांदेकर , बबन गुरव , निशान तेर्से , विनायक ढवळ इत्यादी उपस्थित होते . सर्व कार्यकत्यांनी चर्चेत सहभाग घेऊन वरीलप्रमाणे युध्दपातळीवर आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करीत येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला . ब्रिटीश काळात अतिदुर्गम फोंडाघाट , आंबोली घाट यातून ब्रिटीशांनी चार – पाच वर्षात घाटमार्ग तयार केले आणि आम्हांला सोनवडे घाटमार्ग तयार करायला पन्नास वर्षे लागावीत ही महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे . सोनवडे घाटातून विद्यार्थी जांभवडे कॉलेजला जा – ये करतात . डोक्यावर ओझे घेऊन लोक घाटमार्गावरून ये – जा करतात . एवढा सोपा सोनवडे घाट आहे . गारगोटी – कोल्हापूर घाटमाथ्यापर्यंतचा हायवे गेल्या चाळीस वर्षात तयार झाला आहे . पण सिंधुदुर्गातील घाटमार्ग तयार झाला नाही याला सिंधुदुर्गातीलच अभियंतेच जबाबदार आहेत . मोनार्च कंपनीला घाटमार्गाची आखणी करायला दिली . त्यांनी उंच चढ अधिक ठेवले , त्यामुळे २० टन वजनाची गाडी त्यामार्गाने चढू शकणार नाही म्हणून तो चढ एका महिन्यात कमी करा म्हणजे टेंडर प्रोसेस सुरु करता येईल असे म्हणून मंत्रालयातील प्रमुख इंजिनिअरनी सांगितले पण त्यानंतर आठ महिने अभियंत्यानी व लोकप्रतिनिधींनी कार्यवाही सुरु केली नाही हा शासन – प्रशासनाचा बेजबाबदारपणा आहे . सोनवडे घाटमार्गावर खर्च पडणारा निधी अन्य मार्गाकडे वळवण्याचे शासनाचे कट कारस्थान असू शकेल . अन्यथा लांबीचा रस्ता तयार करून उंच भाग टळता येतो
. ह्या लांबीच्या रस्त्याचे काम नंतर करता येते . इतर घाटमार्गाचे काम त्वरीत सुरु करता येते आणि तसे ते करावे अशी विनंती शासन प्रशासनाला आम्ही करीत आहोत . अन्यथा आंदोलन अटळ आहेत . असे शेवटी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा . नाटेकर यांनी इशारा दिला आहे .ग्रामस्थांच्या मागणीनुसार राज्य शासनाने १ ९ ८० साली पणदूर – सोनवडे – घोटगे – गारगोटी हा ७९ नंबरचा हायवे मंजूर केला म्हणून ग्रामस्थांना आनंद झाला . पण त्यानंतर चार – पाच वर्षे शासनाने काहीच हालचाल केली नाही म्हणून सिंधुदुर्ग व कोल्हापूरच्या ग्रामस्थांनी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी उपोषण सुरु केले . त्यावेळी घाटमार्ग करण्याच्या हालचाली सुरु झाल्या . परंतु कामाला वेग येईना म्हणून रस्ता रोको , धरणे , घेराव , आत्मदहन इत्यादी आंदोलने केल्यावर घाटमार्गाच्या कामाला गती आली . पण घाटमार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु होईना म्हणून सोनवडे घाटमाथ्याच्या पायथ्याशी आत्मदहन आंदोलन केले . तेव्हा सार्वजनिक बांधकाम खाते सावंतवाडीच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या सही शिक्क्यानिशी जानेवारी २०१ ९ ला सोनवडे घाटमार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु होईल असे लेखी आश्वासन दिले , पण प्रत्यक्षात तसे काम सुरु न झाल्याने मुंबई – गोवा हायवेवर हजारोंच्या संख्येने पणदूर तिठा येथे रस्ता रोको आंदोलन केले असे प्रा. नाटेकर म्हणाले.
