माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांची निवेदनाद्वारे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे मागणी
सावंतवाडी-: येथील समाज मंदिर परिसरातील दलीतवस्ती मध्ये सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीच्या दोन चाळी असून, या चाळीत स्वच्छता कर्मचारी तसेच इतर दलीत समाजाची कुटुंबे राहत असून, त्या भागात दलितवस्ती सुधार योजनेतून निधी मंजूर करावा अशी मागणी सावंतवाडीतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी आमदार दीपक केसरकर यांचे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, समाज मंदिर परिसरात सावंतवाडी नगरपालिकेच्या मालकीच्या दोन चाळीत स्वच्छता कर्मचारी राहत असून, इतर दलीत समाजाची कुटुंबे आहेत. या चाळींच्या समोरील भागात पावसाळ्यात दलदल व चिखल होत आहे. तसेच या भागातील एका चाळीच्या समोरील संरक्षण भिंत कोसळली आहे. त्यामुळे ही कामे तातडीने होणे गरजेचे असून, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटार बांधकाम, पावसाचे पाणी घरात येऊ नये म्हणून पत्र्याची शेड व पेलव्हर ब्लॉक इत्यादी कामे होणे आवश्यक असून, त्यासाठी दलीत वस्ती सुधारणा योजनेतून या कामांसाठी अंदाजे २५ लाख रुपये एवढ्या निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
