Headlines

व्यावसायिक अभ्यासक्रमांत इंटर्नशिपला अनन्यसाधारण महत्त्व…

श्वेता कोरगावकर; व्ही. एन. नाबर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना इंटर्नशिप प्रमाणपत्रांचे वितरण..

⚡बांदा ता.२३-: आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी इंटर्नशिप अत्यंत महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध कौशल्ये विकसित करून भविष्यात उद्योजक होण्याचे स्वप्न पाहावे, असे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी येथे केले.
व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा येथे कौशल्य विकास उपक्रमांतर्गत ८० तासांची इंटर्नशिप यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर युवा उद्योजिका सिद्धी गावडे, एम.एस.ए.टी. कमिटीचे सदस्य नारायण पित्रे, प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, न्हानू देसाई आणि नवास शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ. कोरगावकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाबरोबरच आत्मविश्वासाने व्यक्त होण्याची क्षमता निर्माण होणेही महत्त्वाचे आहे. आत्मसात केलेली कौशल्ये भविष्यात विविध टप्प्यांवर उपयोगी पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. कौशल्य विकासाच्या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशालेने अग्रक्रम मिळविल्याबद्दल त्यांनी शिक्षक, विद्यार्थी आणि संबंधितांचे अभिनंदन केले. मोबाईल ही आजच्या काळाची गरज असली, तरी त्याचा वापर मर्यादित ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
नाबर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एम.एस.ए.टी.सारखा उपक्रम राबविला जात असल्याने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान, विविध कौशल्ये आणि भविष्यातील व्यवसायाच्या संधींची ओळख होत आहे. ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
व्यवसायातील बारकावे इंटर्नशिपमधून शिकता येतात
युवा उद्योजिका सिद्धी गावडे यांनी व्यावसायिक शिक्षण घेताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याबरोबरच उत्पादनांचे मार्केटिंग, ग्राहकांशी संवाद आणि व्यवसायातील बारकावे शिकणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, शिक्षण घेत असतानाच व्यवसायाचे ज्ञान मिळाल्यास भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करताना त्याचा निश्चित फायदा होतो. स्वतःही जवळपास सहा महिने इंटर्नशिप पूर्ण करून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतल्याचे सांगताना त्यांनी या अनुभवातून उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, मार्केटिंग करणे आणि ग्राहकांशी संवाद साधणे यांसारखी कौशल्ये शिकायला मिळाल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थी या इंटर्नशिपमध्ये सहभागी झाले होते. मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागांतील विद्यार्थ्यांनाही कोकणातील फळांविषयी विशेष उत्सुकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोकणातील आंबा, काजू, फणस, कोकम आणि इतर स्थानिक फळांमध्ये मोठी व्यावसायिक क्षमता आहे. या उत्पादनांची योग्य माहिती, आकर्षक पॅकेजिंग आणि प्रभावी मार्केटिंग केल्यास त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. सान्वी राऊळ, रिदा शेख आणि सुयश गावकर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्री देवी सरस्वती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी निदेशिका रिया देसाई उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक राकेश परब यांनी केले. सूत्रसंचालन निदेशक भूषण सावंत यांनी केले, तर निदेशिका गायत्री देसाई यांनी आभार मानले.
फोटो:-
बांदा नाबर प्रशालेत आयोजित कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित असलेले मान्यवर.

You cannot copy content of this page