Headlines

कुडाळात नर्मदाआई संस्थेचा दिवाळी खरेदी महोत्सव सुरू…

३६ स्टॉल्सवर विविध वस्तूंची रेलचेल:’नर्मदाआई’ तर्फे महिला व्यावसायिकांना आता मुंबईत संधी..

⚡कुडाळ ता.२३-: नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने संस्थापक अध्यक्षा सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या संकल्पनेतून कुडाळ येथे दिवाळीनिमित्त आजपासून विशेष प्रदर्शन व खरेदी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही आत्मनिर्भर संकल्पनेतून दि. २३, २४ व २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारचे ३६ स्टॉल मांडण्यात आले आहेत. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून आता मुंबई-डोंबिवली मध्ये देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील महिला व्यवसायिक उद्योजक नर्मदाआई संस्थेच्या माध्यमातून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जात असल्याची माहिती संध्या तेरसे यांनी दिली.
कोव्हीड काळापासून जेव्हा सर्व व्यापार-व्यवसाय ठप्प झाला होता तेव्हा महिला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था कुडाळच्या वतीने विक्री प्रदर्शनाला सुरुवात केली. वर्षातून दोन तीन वेळा हे विक्रीप्रदर्शन ग्राहकांसाठी खुले असते. गणेशोत्सव, मकरसंक्रांत, दिवाळी, मे महिन्याची सुट्टी अशावेळी नर्मदाआई संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले जाणारे हे विक्री आणि प्रदर्शन महिला व्यावसायिकांना व्यवसायाचे एक नवे दालन उघडून देते.
यावेळी दिवाळी निमित्त नर्मदाआई संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संध्या तेरसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महालक्ष्मी हॉल मध्ये हे प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याचे उदघाटन संध्या तेरसे यांच्या हस्ते फीत सोडून झाले. यावेळी संस्थेच्या सचिव दीप्ती मोरे, माजी जि प सदस्य मनस्वी घारे, विविध स्टॉल धारक महिला उपस्थित होत्या.
यावेळच्या या विक्री प्रदर्शनाच्या निमित्ताने स्टेट्स स्पर्धा ठेवण्यात आली असून. ज्या स्टेट्सला जास्त व्ह्यूज असतील त्यांना तीन पैठणीसह उत्तेजनार्थ दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती संध्या तेरसे यांनी दिली. त्याच बरोबर यंदा ४,५ आणि ६ नोव्हेंबर रोजी डोंबिवली येथे होणाऱ्या खरेदी महोत्सवात नर्मदाआई संस्थेच्या वतीने येथील महिला उद्योजक आणि व्यवसायीकांना आपला व्यवसाय मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता येथील महिला व्यावसायिक फक्त जिल्ह्यापुरत्या मर्यादित न राहता त्या मुंबईत देखील आपला व्यवसाय वाढवू शकणार आहेत, असे संध्या तेरसे यांनी सांगितले.
रविवारी २५ ऑक्टोबर रोजी या प्रदर्शन व खरेदी महोत्सवाची सांगता होणार असून जिल्ह्यातील खरेदीदारानी मोठ्या संख्येने येऊन प्रदर्शनाला भीत द्यावी, स्टेट्स स्पर्धेत भाग घेऊन पैठणी जिंकावी असे आवाहन नर्मदाआई संस्थेच्या वतीने संध्या तेरसे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page