Headlines

गरजू रुग्णांसह होतकरू विद्यार्थ्यांना सामंत ट्रस्टचा मदतीचा हात…

सावंतवाडीतील सहा रुग्णांना उपचारासाठी, सहा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजारांचे धनादेश..

⚡सावंतवाडी, ता. २३-: महागाईचा वाढता ताण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेले दुष्काळाचे सावट यामुळे अनेक गरजू रुग्णांसह होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबई येथील कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टतर्फे सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली.

सावंतवाडी येथील डॉ. भाऊसाहेब परुळेकर नर्सिंग होम येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. जयेंद्र परुळेकर आणि ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांच्या हस्ते जिल्ह्यातील सहा गरजू रुग्णांना उपचारासाठी, तर सहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. मातोंड येथील परशुराम धुरी यांना डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी, ओटवणे येथील रामकृष्ण गावकर यांना रक्तदाब व शस्त्रक्रियेसाठी, तळवडे येथील तानाजी कुंभार यांना बायपास शस्त्रक्रियेसाठी, ओटवणे येथील रॉकी माडतीस यांना हृदयरोगावरील औषधोपचारासाठी, बिरोडकर टेंब-सावंतवाडी येथील भिकाजी बिरोडकर यांना मधुमेह व रक्तदाबावरील उपचारांसाठी, तर वेर्ले येथील द्रौपदी कदम यांना मणक्यांच्या आजारावरील उपचारांसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत देण्यात आली. तसेच माणगाव येथील दिव्या मेस्त्री, मातोंड येथील सचिन नाईक, गोवा येथील नितीन फडके, मातोंड येथील पूजा राऊत, शिरोडा येथील सुधीर पवार आणि न्हावेली येथील ज्ञानेश नाईक या सहा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. ‘फुल ना फुलाची पाकळी’ या भावनेतून सामंत ट्रस्टकडून सातत्याने गरजू रुग्ण व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात आहे. आर्थिक परिस्थितीअभावी उपचार किंवा शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणारी मदत लाभार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या मदतीबद्दल लाभार्थी व त्यांच्या नातेवाईकांनी कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टचे विश्वस्त जयप्रकाश आडेलकर, रत्नाताई आडेलकर, ॲड. सुनील सामंत, तीर्थराज उर्फ बाळासाहेब सामंत आणि अमितदादा आडेलकर यांचे आभार मानले.”

You cannot copy content of this page